उल्हासनगरात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; कारवाईची मागणी.
गुरुवार, 4 जून 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- उल्हासनगर महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागामार्फत पॅनल क्रमांक 18 मधील दहा चाळ, नालंदा शाळेजवळ नवीन मलनिस्सारण लाईन टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीच्या कामामुळे पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन तुटल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हरेश मिरकुटे यांना तुटलेल्या लाईनबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदाराचे मुकादम विशाल नरवडे यांना याबाबत कळविण्यात आले असता, काम तातडीने करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही.
यावेळी प्लंबर मोरे यांनी, "सायंकाळी 6 वाजता आमची सुट्टी होते. कंपनी 6 नंतरचा पगार देत नाही. कोणाकडेही तक्रार करा, आम्ही काम करणार नाही," असे वक्तव्य केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे तुटलेली पाणीवाहिनी रात्रभर दुरुस्त न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गटारात वाहून गेले.
रात्री सुमारे 11.30 वाजता पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती मुख्य पाणीवाहिनी तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे समोर आले. परिणामी अनेक घरांमध्ये पाणी पोहोचलेच नाही.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बुधवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. त्यानंतर गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नियोजित पाणीबंदी असल्याने नागरिकांवर तब्बल तीन दिवस पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार, मुकादम विशाल नरवडे आणि प्लंबर मोरे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दहा चाळ रहिवासी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र राडे, ॲड. प्रशांत चंदनशिव, सुहास निकम आणि विक्रांत दामोदर यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
0 Response to "उल्हासनगरात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; कारवाईची मागणी."
एक टिप्पणी भेजें