भंडारा-गोंदिया विधान परिषदेत भाजपचा झेंडा.
सोमवार, 22 जून 2026
Comment
• अविनाश ब्राह्मणकरांचा दणदणीत विजय, मतफुटीच्या चर्चांनी...उधान.
• काँग्रेस गटाकडे ११९ मत असताना नरेश ईश्वरकरला १५४ मत ळाली कशी?. म्हणजे ३५ भाजपाचे गद्दार कोण?..
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
भंडारा/तुमसर :- भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी ३०२ मते मिळवत विजय संपादन केला, तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मते मिळाली. भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या १४८मताच्या फरकाने विजय झाला आहे. मात्र या निकालाइतकीच चर्चा महायुतीतील कथित मतफुटीची आणि निवडणुकीभोवती निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची रंगली.
ही निवडणूक केवळ एका जागेसाठीची लढत नव्हती, तर ती दोन प्रभावशाली नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी मानली जात होती. भाजपचे आमदार परिणय फुके आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई बनविले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनी निवडणुकीत उत्सुकतेची कमाल निर्माण केली होती.
काँग्रेसने अखेरच्या क्षणी आपले अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड आणि प्रफुल गोपालदास अग्रवाल यांचे अर्ज मागे घेत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयाने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्वांना उधाण आले होते.
दरम्यान, प्रचाराच्या काळात नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाकडून उमेदवारांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणला जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे निवडणुकीला अधिकच राजकीय धार प्राप्त झाली. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी महायुतीतील काही मते फुटतील, असे भाकीत केले होते. निकालानंतरच्या मतसंख्येवरून महायुतीतील अंदाजे १० ते १२ मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मतमोजणीच्या दिवशी निकाल स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अविनाश ब्राह्मणकर यांच्या विजयाने महायुतीने आपले संघटनात्मक वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले. मात्र नरेश ईश्वरकर यांना मिळालेली १५४ मते महाविकास आघाडीच्या प्रभावाची नोंद करून देणारी ठरली.
या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली की, भंडारा-गोंदियाच्या राजकारणात अंकगणिताइतकेच रसायनशास्त्रही महत्त्वाचे आहे. विजय भाजपच्या पदरात पडला असला, तरी मतफुटीच्या चर्चांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय समीकरणांची नांदी दिल्याचे मानले जात आहे. राजकीय पटावरील हा डाव संपला असला, तरी त्याचे पडसाद आगामी काळातही उमटत राहणार, हे निश्चित.
भंडारा गोंदिया विधान परिषद करिता झालेल्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाला होता ४५७ पैकी ४५७ मतदारांन आपल्या मताधिकाऱ्याचा उपयोग केला होता. अविनाश ब्राह्मणकर यांना ३०२ मते मिळाली तर काँग्रेस समर्थित नरेश ईश्वरकर यांना १५४ मते मिळाली तर एक मत अवैध ठरलेला आहे.त्यात भाजपाचे ३५ मतदारांनी गद्दारी केल्याची चर्चेचा विषय आहे.
0 Response to "भंडारा-गोंदिया विधान परिषदेत भाजपचा झेंडा."
एक टिप्पणी भेजें