-->
बौद्धांचे राजकीय अस्तित्व एक शोकांतिका !..

बौद्धांचे राजकीय अस्तित्व एक शोकांतिका !..



              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला न्याय आणी स्वाभिमान मिळवून देण्यासाठी एकजूट होऊन संघटनात्मक कार्य करण्यावर आणी संघटन कौशल्य विकसित करण्यावर भर दिला. समाज संघटित राहिल्याने सामाजिक परिस्थितीवर काय फरक पडू शकतो याचे महत्व पटवून दिले. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्र दिला -- शिका , संघर्ष करा आणी संघटित व्हा ! या मागे समाजहिताचा फार मोठा विचार आहे तो आपण निर्मळ मनाने समजून घेतला पाहिजे.      
            समाजातील प्रत्येक घटकासाठी तसेच देशासाठी सदैव कार्य करीत राहिल्यामुळे बाबासाहेबांच्या तब्बेतीवर परिणाम झाल्यामुळे बाबासाहेब आपल्यातून लवकर निघून गेलेत त्यामुळे समाज पोरका झाला आणी त्यानंतर सामाजिक संघटन ज्या ताकदीने उभे राहायला पाहिजे होते त्या ताकदीने उभे राहिले नाही.
  
          समाजातील काही संधीसाधू व महत्वाकांक्षी सदगृहस्तांनी स्वतःच्या विचारधारेवर आधारित सामाजिक संघटन निर्माण करून त्यांची वेगवेगळी शकले पडून स्वतःच्या नावे पक्ष स्थापन केले. त्यामुळे खाऱ्या अर्थाने इथूनच पुढे सामाजिक संघटनेच्या एकोप्याचे विघटन व्हायला सुरुवात झाली त्यामुळे समाजाचे सामाजिक अस्तित्व कमी झाले आणि राजकीय अस्तित्व धोक्यात आले. त्याचे गंभीर परिणाम सध्या समाज भोगत आहे.
           आज राजकीय परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे समाजाप्रती मवाळ धोरण असल्यामुळे काही अंशी काँग्रेस समाजाला जवळ करेलही परंतु भारतीय जनता पक्षाला समाजाप्रती असलेल्या द्वेषामुळे त्यांना निवडणुकीत बौद्ध समाजाची गरज नाही. बौद्ध समाजावीना त्यांचा पक्ष निवडून येऊ शकतो ही त्यांची आज स्थिती आहे कारण “दगडापेक्षा वीट मऊ” या उक्तीचा प्रत्यय येत आहे म्हणजे बौद्ध समाजापेक्षा हिंदू दलितांना (जसे चांभार, मांग, ढोर, खाटीक, बुरड अश्या अनुसूचित जातीतील 59 पैकी 58 जाती आहेत त्यामध्ये बौद्ध समाज धरून 59 जाती आहेत) प्राधान्य देण्यात येत आहे. हेच धोरण कमीजास्त प्रमाणात काँग्रेस व इतर पक्षाने अंगीकारले आहे. त्यामुळे बौद्ध समाज आपोआपच निवडणुकीतून बाहेर पडलेला आहे. 

       काँग्रेस, भाजप व इतर समकक्ष पक्ष बौद्ध समाजातील कोणत्याही व्यक्तीला खुल्या मतदार संघामधून निवडणूक लढण्यासाठी कधीही तिकीट देत नाहीत त्याउलट उपकारपर आरक्षित मतदार संघामधूनच निवडणूक लढण्यास आदेश देतात व त्यामध्येही मुत्सद्देगिरीने बौद्ध किंवा हिंदू दलितांना एकमेकांविरोधात उभे करतात म्हणजे तुमच्याच हाताने तुमच्या माणसाचा जीव घ्या अशी रणनीतीचा वापर करतात. आमच्याच समाजाच्या विरोधात आम्ही लढावे व निवडून यावे यात कोणता मर्दपणा आहे यात तर निवडून न आलेल्या आमच्याच माणसाचे नुकसान होत आहे हे आम्हाला समजणे फार महत्वाचे आहे. आज कोणत्याही राजकीय पक्षात बौध्द समाजातील व्यक्ती कितीही लायक असला तरी त्या व्यक्तीला कार्यकर्ता म्हणूनच त्याची ओळख त्या पक्षात आहे. त्यांना तुमची आता गरज राहिलेली नाही, वास्तविक पाहता तुमची गरज आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाता. 
      एकजुटीअभावी आम्हीच आमच्या समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहोत, प्रामुख्याने विदर्भामधील काही जिल्ह्यात पोटजातीवर आधारित बौध्द समाज विभागल्याचे निदर्शनात येत आहे व त्यांच्याच मध्ये आपापसात नेता बनण्याची स्पर्धा व चढाओढ सुरु आहे त्यामुळे समाजाचे संघटन व एकजूट होणार कशी ? बर आपल्या या विकसित केलेल्या कौशल्याचा पुरेपूर राजकीय फायदा काँग्रेस, भाजप व इतर समकक्ष पक्ष यांना हाताशी धरून काही आमिष दाखवून एकमेकांविरुद्ध करतात व संघटनास बाधा उत्पन्न करतात परंतु त्यांना दोष देऊन काय उपयोग, आपल्याला समजायला पाहिजे. आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की समाजच समाजाच्या माणसाच्या कामी पडणार आहे इतर समाज नाही असे माझे माय आहे. दुसरे महत्वाचे असे की आपणच आपल्या समाजाच्या उन्नतीचे एकसंघ होऊन मार्ग शोधले पाहिजेत आज ती वेळ आलेली आहे. बौध्द समाजाला समाजाच्या उतरंडीवर प्रत्येक टप्प्यावर नेस्तनाभूत करण्याचे कट कारस्थान जोरात सुरु आहे त्यामुळे सजग राहून आपल्या कार्यशैलीत बदल करणे आवश्यक आहे तेंव्हाच आपण राजकीय पटलावर यशस्वी होऊ शकतो अन्यथा नाही असे मला वाटते. बौध्द समाजाचा राजकीय दबाव गट तयार होणे अत्यन्त महत्वाचे आहे तरच आपली किंमत वाढेल.

            शासनकर्ती जमात होण्यासाठी तुम्हाला कायदेमंडळात (विधानसभा आणी संसद ) आमदार किंवा खासदार म्हणून निवडून जाणे महत्वाचे आहे. तेंव्हाच तुम्ही समाजासाठी, समाजाच्या हितासाठी कायदे करू शकता. त्यासाठी तुम्हाला मार्ग बदलणे आवश्यक आहे. सर्व मतभेद , अंतर्गत वादावादी दया फेकून आणी व्हा एक आणी दाखवा कमालi आज अनुसूचित जातीतील सर्व समाज ज्या परिस्थितीत राहतो त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी किती कष्ट व त्रास सहन केला हे विसरता कामा नये.
  
           त्याकाळी विपरीत परिस्थितीत माझा एकटा भीमा प्रतिगाम्यांना उरून पुरला होता आज तर त्यांचे असंख्य दमदार अनुयायी आहेत तर मग ते का त्या सर्वांना उरून पुरणार नाहीत? याचे सदैव स्मरण आपण ठेवले पाहिजे. 
    (दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या पुढाऱ्यांपासून सावध राहा. केवळ एखादा पक्ष किंवा संघटना शक्तिशाली आहे म्हणून आपली तेथे कदर होईल, या भाबड्या आशेने त्यांच्याशी संगनमत करणे हा भिकाऱ्याचा मार्ग असून ती लज्जास्पद शरणागती आहे. कोणताही स्वाभिमानी व सत्यनिष्ठ माणूस असे वर्तन सहन करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मनमाड, २६ जानेवारी १९४४)

ऍड. रविंद्र की परघणे 
अमरावती

0 Response to "बौद्धांचे राजकीय अस्तित्व एक शोकांतिका !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article