चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला; प्रिशा चंदनशिवच्या अनोख्या पुढाकाराने उघड्या वॉलचा धोका आला समोर!..
शुक्रवार, 3 जुलाई 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- दहा चाळ रोड परिसरातील पाणीपुरवठा विभागाने पाणी वितरणासाठी बसविलेल्या लहान वॉल (मॅनहोल) वर कोणत्याही प्रकारचे झाकण नसल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी सत्य साई निकेतन शाळेतील विद्यार्थिनी प्रिशा चंदनशिव हिने नागरिकांना व लहान मुलांना वॉल सहज दिसावा म्हणून त्यावर झाडे लावून सामाजिक जाणीवेचे उदाहरण घालून दिले.
काल पावसामुळे वॉलमध्ये पाणी साचल्याने तो पूर्णपणे झाकला गेला होता. याचवेळी शाळेत जाणाऱ्या सुमारे चार वर्षांच्या चिमुकलीला तो दिसला नाही. तिचा पाय वॉलमध्ये अडकल्याने ती तोंडावर पडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र या घटनेत गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. वेळेवर लक्ष न दिल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी संबंधित वॉलवर तातडीने मजबूत झाकण बसविणे अथवा अन्य सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पाणीपुरवठा विभाग तसेच आयुक्त मॅडम यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले असून, उपविभागीय कार्यालयात जाऊन अभियंता मिरकुटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही समस्या निदर्शनास आणून दिली.
स्थानिक नागरिकांनीही पाणीपुरवठा विभागाने या धोकादायक वॉलची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात कोणत्याही निष्पाप बालकाचा जीव धोक्यात येणार नाही, अशी मागणी केली आहे.
0 Response to "चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला; प्रिशा चंदनशिवच्या अनोख्या पुढाकाराने उघड्या वॉलचा धोका आला समोर!.."
एक टिप्पणी भेजें