पस-ए-दीवार २ जुलैखिडकीतून पाऊस..
शनिवार, 4 जुलाई 2026
Comment
पाऊस आला की खिडकी उघडावीशी वाटते. बाहेर बघावं, पण भिजू नये. अशी सोय हवी असते. अशाच नुसत्या मजा घेत बघण्याला फ़रहत एहसास शब्द देतात,
देखते बादल से बारिश तक सफ़र तकलीफ़ का
तुम मिरी आँखें अगर रोने से पहले देखते
ढगापासून पावसापर्यंतचा त्रासाचा प्रवास बघितलास. जर तू माझे डोळे रडण्याआधी बघितले असतेस तर ? तुला माझी नेमकी व्यथा कळाली असती. खिडकीतून पाऊस बघणं सोपं. पण डोळ्यातला पाऊस बघायला जवळ जावं लागतं. अंतर कमी करावं लागतं. ढग जमा होतात तेव्हाच कळलं असतं तर कदाचित पाऊस टळला असता. मरहूम शायर अतहर नासिक त्या रिपरिप पावसाबद्दल बोलतात,
अभी कुछ देर में हो जाएगा आँगन जल-थल
अभी आग़ाज़ है बारिश का अभी किन-मिन है
अजून थोड्या वेळात अंगण जलमय होईल. आत्ताच पावसाची सुरुवात आहे, आत्ता रिपरिप कुठे सुरू झाली आहे. खिडकीतून रिपरिप बघत बसणं म्हणजे संकटाची वाट बघणं. तो वाढणार हे माहीत असतं. थेंब थेंब वाढत जातो आणि मग धार लागते. तसंच दुःखाचं असतं. आधी हळू, मग कोसळतं.अदीम हाशमी पाऊस कसा आरसा शोधतो ते सांगतात,
बारिश ने अपना अक्स कहीं देखना न हो
क्यूँ आइने उभरने लगे हैं हबाब में
पावसाला स्वतःचं प्रतिबिंब बघायचं असेल. मग हे बुडबुड्यात आरसे का येतायत ? खिडकीवरचे थेंबही आरसेच. प्रत्येक थेंबात बाहेरचं जग लहान होऊन दिसतं. आणि त्यात आपलाच चेहरा दिसतो. पाऊस बघायला गेलो की स्वतःलाच बघतो. खिडकी आरसा होते. आपल्याला पावसाची ओढ लागते, पण पावसाला ? ते फ़रहत अब्बास शाह सांगतात,
फूल ख़ुश्बू हवा शजर बारिश
एक तेरी तरफ़ ही माइल हैं
फूल, सुगंध, वारा, झाड, पाऊस - सगळे तुझ्याकडेच ओढले जातायत. खिडकीत बसून बघितलं तरी पाऊस तिचीच आठवण करून देतो. कारण तो तिच्यासाठीच पडतोय असं वाटतं. प्रत्येक थेंब तिचं नाव घेतो. वारा तिचा निरोप आणतो. तिचा निरोप आला की किती भरल्यासारखे वाटते. ज़ियाउल मुस्तफ़ा सांगतात,
थोड़ी सी बारिश होती है
कितनी जल्दी भर जाता हूँ
थोडा पाऊस पडतो, आणि मी किती लवकर भरून जातो. खिडकीतून थेंब मोजत बसलो तरी काळीज भरतं. कारण आत आधीच खूप काही साठलेलं असतं. एक थेंब पडला की धरण फुटतं. बाहेरचा पाऊस आतल्या पावसाला वाट करून देतो. खिडकीतला पाऊस सुरक्षित वाटतो. काचेमध्ये अंतर ठेवता येतं. पण तो आत येत नाही असं नाही. तो डोळ्यांतून येतो. खिडकी बंद केली तरी तो आतच असतो.
प्रदीप निफाडकर
९९२२१२७४९२
0 Response to "पस-ए-दीवार २ जुलैखिडकीतून पाऊस.."
एक टिप्पणी भेजें