यूपीआयद्वारे ६.११ लाखांनी ऑनलाइन फसवणूक
रविवार, 26 जुलाई 2026
Comment
तुमसरातील बसचालक जाळ्यात सायबर पोलिसात गुन्हा दाखल.
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर : तुमसर येथील परिसरातील एका खासगी शाळेच्या बसचालकाची यूपीआय व्यवहाराद्वारे ६ लाख ११ हजार ६०९ रुपये ८२ पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भंडारा सायबर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४) व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
रवींद्र श्रावण बुधे (५५, रा. श्रीरामनगर, तुमसर) असे फसवणूक झालेल्या बसचालकाचे नाव आहे. त्यांचे
आयसीआयसीआय आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेत बचत खाते असून ते मोबाइलमधील फोन पे अॅपद्वारे व्यवहार करत असत. १२ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता त्यांच्या मोबाइलवर खात्यातून पैसे कपात झाल्याचे सलग संदेश येण्यास सुरुवात झाली. भामट्याने आयसीआयसीआय बँक खात्यातून २ लाख २३ हजार रुपये आणि एयू स्मॉल फायनान्स बँक खात्यातून ३ लाख ८८ हजार ६०९ रुपये असा एकूण ६.११ लाखांचा डल्ला मारला. मोबाइलवर संदेश धडकताच बुधे यांनी बँकांशी
संपर्क साधून खाती गोठविली. परंतु तोपर्यंत मोठी रक्कम लंपास झाली होती. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून भंडारा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक रुचिरा पात्रे यांनी केली. नागरिक आणि बँक ग्राहकांनी अनोळखी लिंक अथवा ओटीपी शेअर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Response to "यूपीआयद्वारे ६.११ लाखांनी ऑनलाइन फसवणूक"
एक टिप्पणी भेजें