बालमजुरी करवून घेणाऱ्या दोषी क्रंत्राटदारवर कार्यवाही करा! .. क्रांतिज्योती महिला संघटन.
मंगलवार, 14 जुलाई 2026
Comment
• गटग्रामपंचायत कवलेवाडा येथील प्रकार
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- बालमजुरी करवून घेणाऱ्या दोषींवर बाल हक्क संरक्षण कायदा 2015 व बालमजुरी प्रतिबंधक कायदा 1986 अंतर्गत चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावी व दुर्गेश मधुसूदन सार्वे ह्या बालमजुरांला यांना न्याय मिळावा अशी मागणी क्रांतिज्योती महिला सघटन लाखनी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दुर्गेश मधुसूदन सार्वे वय वर्ष 15 हा अल्पवयीन मुलगा आपले आजी आजोबा यांचे सोबत मौजा कवडसी तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे राहत असून इयत्ता 10 व्या वर्गात शिकत आहे. व त्याला शिकून पोलीस बनायचे आहे , या मुलाचे आई-वडील नागपूर येथे मोल मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात.
ग्रामपंचायत सदस्य व नालीसफाई कामाचे ठेकेदार राजकुमार खंडाईत यांनी मे 2026 मध्ये मी तुम्हाला काम देतो व कामाचा मोबदलाही देतो असे आमिष देत मुलांच्या वयाचा विचार न करता नालीच्या सफाईच्या कामावर घेऊन गेले दिनांक 8/ 5 / 2026 ते 24 / 5 / 2026 पर्यंत दुर्गेश सार्वे नामक बालकाकडून काम करून घेतले व दर दिवशी 350/- प्रमाणे 16 दिवसाचे मजुरीचे पैसे दिले .
दिनांक 24/5/2026 ला नाली सफाई चे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने दुर्गेश सार्वे ला नाली वरील सिमेंट खर्च उचलण्यास सांगितले , क्षमतेपेक्षा जास्त वजनदार सिमेंट फरशी उचलत असताना ती फरशी दुर्गेश याच्या पायावर पडली त्यामुळे दुर्गेश च्या पायाच्या अंगठा दबून चंदामेंदा होऊन रक्तबंबाळ झाला.
त्यावेळी ठेकेदार व काही लोकांनी दुर्गेश सार्वे ला पालांदूर येथील डॉक्टर हजारे यांचे कडे घेऊन गेले. डॉक्टर हजारे यांनी बेजबाबदारपणे थातूरमातूर उपचार केला. परत पुन्हा 3 दिवसांनी संबंधित ठेकेदार राजकुमार खंडाईत यांनी दुर्गेश सार्वे याला डॉक्टर हजारे यांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याची जखम खराब झाली असे सांगितले व भंडाऱ्याला डॉक्टर प्रदीप आकरे न्यू लाइफ हॉस्पिटल राजीव गांधी चौक भंडारा येथे नेण्यास सांगितले. डॉक्टर आकरे यांनी दुर्गेश सार्वे याची जखम तपासून त्याला दवाखान्यात भरती केले जखम जास्त खराब झाल्याने डॉक्टर आकरे यांनी त्याला नागपूरला जाण्यास सांगितले. त्यानंतर दुर्गेश ला शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे उपचारार्थ भरती केले. दुर्गेश च्या अंगठ्यामध्ये संसर्ग जास्त पसरल्याने दिनांक 2 /6/ 2026 ला डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑपरेशन द्वारा दुर्गेशचा पायाच्या अंगठा कापण्यात आला, व दुर्गेश ला दुर्दैवी कायमचे अपंगत्व आले.
या सर्व प्रकारांमध्ये ठेकेदार खंडाइत यांचेकडून दुर्गेश च्या परिवाराला थातूरमातूर काही आर्थिक रक्कम देऊन शांत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशाही आरोप त्यांनी केला
आहे.जर वेळीच पालांदूर चे डॉक्टर हजारे यांनी चौकशी करून पोलिसांना कळवले असते तर वेळीच प्रकरणाची चौकशी झाली असती, परंतु डॉ.हजारे, डॉ. आकरे, व शालिनीताई मेघे हॉस्पिटल मधील डॉक्टर ज्यांनी बाळाचा ऑपरेशन करून अंगठा कापला या तिन्ही सुज्ञ डॉक्टरांनी सुद्धा बाळाचा अंगठा इतका खराब कां झाला याबाबत साधी चौकशीही केली नाही यावरून डॉक्टरांचा सुद्धा बेजबाबदारपणा लक्षात येतो जर तिन्ही डॉक्टरांपैकी कुणीतरी जबाबदारीने दखल घेत कसून विचारणा केली असती तर सत्य बाहेर आले असते , परंतु गरीबाचा कुणीही वाली नसतो हे निदर्शनास आले.
सरपंच मनीषा खंडाईत व ठेकेदार राजकुमार खंडाईत
यांनी हेतू पुरस्पर दुर्गेश सार्वे व त्याच्या परिवाराला याबाबत कोणालाही काही सांगू नका असे बोलून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरात चर्चा आहे. दुर्गेश सर्वे हा बालमजूर असल्याची खात्री असल्याने त्यांनी पोलिसांपासून बचाव करण्याच्या हेतूने व आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये याकरिता दुर्गेश सार्वे व त्याच्या गरीब परिवाराचे आर्थिक मानसिक व शारीरिक नुकसान केले आहे , व दुर्गेश चे आयुष्यात कधीही भरून न निघणारे शारीरिक नुकसान करून त्याला कायमचे अपंगत्व दिले आहे . हे सर्व कार्य संगणमताने गुन्ह्याच्या बचावासाठी करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.
बालमजुरी करून घेणे हे कायद्याने गुन्हा आहे मजुरी वाचविण्यासाठी लहान बालकांकडून अवैधरित्या धोकादायक व जोखमीचे काम करून घेऊन त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या व दुर्गेश च्या कायम अपंगत्वास कारणीभूत असणाऱ्या राजकुमार खंडाईत ग्रामपंचायत सदस्य व ठेकेदार ,स्वप्निल खंडाईत , मनीषा खंडाईत सरपंच ,प्रदीप चेटूले ग्रामसेवक , डॉ. हजारे पालांदूर यांचेवर बालहक्क संरक्षण कायदा 2005 व बालमजुरी प्रतिबंधक कायदा 1986 तसेच भारतीय न्याय संहिता 118 ( BNS) नुसार नि:ष्पक्ष चौकशी करून योग्य कलमा अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करण्यात यावी. व अपघातग्रस्त बालमजूर दुर्गेश सार्वे यास न्याय देण्यात यावा .
व कधीही भरून न निघणारी नुकसान भरपाई करून त्याचे सुयोग्य पुनर्वसन करण्यात यावे.
दुर्गेश ला न्याय न मिळाल्यास शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र जन आंदोलन करून निषेध नोंदवल्या जाईल याची दखल घेण्यात यावी.
क्रांतीज्योती महिला संघटन लाखनी
जि. भंडारा व शिष्ठमंडळ यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदन जिल्हाधिकारी भंडारा, पोलीस अधीक्षक भंडारा,तहसीलदार
लाखनी,महिला व बालकल्याण अधिकारी भंडारा , ,कामगार आयुक्त कार्यालय भंडारा ,
जिल्हा शिक्षणाधिकारी भंडारा पाठवण्यात आले आहे असे निवेदनाद्वारे कळविले .. निवेदन देतेवेळी अश्विनी भिवगडे ,सुमन कानेकर, हर्षा वंजारी ,कमल गणवीर, वीना डोंगरे ,साधना शिंगाडे, नलिनी ढवळे, वर्षा हुमणे सह क्रांतीज्योती महिला संघटनच्या सदस्या उपस्थित होत्या...
0 Response to "बालमजुरी करवून घेणाऱ्या दोषी क्रंत्राटदारवर कार्यवाही करा! .. क्रांतिज्योती महिला संघटन. "
एक टिप्पणी भेजें