भंडारा जिल्ह्याच्या कन्येची ऐतिहासिक कामगिरी.
गुरुवार, 2 जुलाई 2026
Comment
• डॉ. सुचिता तिरपुडे यांनी मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा प्रतिनिधी :- भंडारा जिल्ह्यातील दिघोरी (मोठी) येथील मुळच्या रहिवासी तथा न्यूरोसर्जन व स्पाईन सर्जन डॉ. सुचिता आय. तिरपुडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राच्या शासकीय आरोग्य सेवेत मानाचा टप्पा गाठला आहे.
दि. १९ जून २०२६ रोजी मुंबईच्या परळ येथील ईएसआयएस महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात प्रथमच मेंदूवरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेत क्रॅनिओटॉमी करून अत्याधुनिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने रुग्णाच्या मेंदूमधील मेटास्टॅटिक ट्यूमर (गाठ) यशस्वीपणे काढण्यात आला. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही गुंतागुंत निर्माण झाली नाही. संपूर्ण शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. सुचिता तिरपुडे यांनी अत्यंत कुशलतेने केले.
ही कामगिरी केवळ एका डॉक्टरच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून, भंडारा जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद ठरली आहे. आपल्या ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर डॉ. तिरपुडे यांनी अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजपर्यंत डॉ. सुचिता तिरपुडे यांनी दोनशेहून अधिक जॉईंट सर्जरी, दोन स्पाईन सर्जरी तसेच एक गुंतागुंतीची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
डॉ. सुचिता तिरपुडे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल भंडारा जिल्ह्यासह राज्यभरातील वैद्यकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांच्या हातून अशाच अनेक यशस्वी शस्त्रक्रिया होऊन असंख्य रुग्णांना नवजीवन लाभावे, तसेच भंडारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल व्हावे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
0 Response to "भंडारा जिल्ह्याच्या कन्येची ऐतिहासिक कामगिरी."
एक टिप्पणी भेजें