विद्यार्थ्यांच्या हितासाठी मांगली–पवनी एसटी बस सेवा तात्काळ सुरू करा.
शुक्रवार, 24 जुलाई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे तात्पुरती बंद करण्यात आलेली मांगली–पवनी एसटी बस सेवा आता कोणताही विलंब न करता पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामपंचायत सदस्य चेतन पडोळे यांनी पवनी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मांगली व परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज शाळा, महाविद्यालय, आयटीआय आणि विविध शैक्षणिक कामांसाठी पवनी येथे ये-जा करतात. तसेच शेतकरी, मजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचीही या बस सेवेवर मोठ्या प्रमाणात भिस्त आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव एसटी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता रस्ता पूर्णपणे सुरळीत झाला असून चिखलही पूर्णपणे हटला आहे. त्यामुळे बस सेवा बंद ठेवण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही.
बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना रोज खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांच्या पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा व महाविद्यालय गाठणेही कठीण जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांना दवाखाना, शासकीय कार्यालये, बँका आणि बाजारपेठेत जाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यामुळे "एसटी ही ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आणि जनतेची गैरसोय लक्षात घेऊन मांगली–पवनी एसटी बस सेवा तात्काळ सुरू करावी," अशी ठाम मागणी चेतन पडोळे यांनी केली. तसेच प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष न करता त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चेतन पडोळे (मांगली चौ.), विवेक पडोळे, विक्की रामटेक, गणेश मनापुरे, राहुल कावळे, कुशाल वरंबे, विकास वैद्य, देवदास गणवीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी पवनी आगार प्रमुखांना निवेदन सादर करून मांगली–पवनी बस सेवा तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली. आगार प्रमुखांनी निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
0 Response to "विद्यार्थ्यांच्या हितासाठी मांगली–पवनी एसटी बस सेवा तात्काळ सुरू करा."
एक टिप्पणी भेजें