-->
काव्य.. ज्वाला!..

काव्य.. ज्वाला!..


संकलन :- हर्षवर्धन देशभ्रतार 

जंतर-मंतरचा एल्गार

जंतर-मंतरवरील लढा होता,
लोकशाहीच्या संविधानिक मूल्यांचा;
सत्ता झाली नतमस्तक अखेरी,
हा एल्गार होता तरुण भारताचा..!

बरबटलेल्या शिक्षण व्यवस्थेने,
भावी पिढ्यांचा होतो आहे घात;
कसा घडेल देश महासत्ताक , 
जेव्हा भ्रष्ट व्यवस्थेचा होतो भविष्यावर आघात..!

शिक्षण जेथे विकले जाते,
तेथे स्वप्नांचाही होतो लिलाव;
ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर,
उभा राहतो अन्यायाचा ठाव..!

दंडुकेशाहीने सत्याचा आवाज,
कधीच चिरडला जात नसतो;
इतिहास साक्षी आहे युगायुगांचा,
सत्तेचा माज क्षणभंगुरच असतो..!

लढा होता व्यवस्था परिवर्तनाचा,
बंडाशिवाय तो साध्य नसतो;
कितीही दाबला गळा लोकशाहीचा,
जनतेचा हुंकार अमरच असतो..!

हातात होती संविधानाची मशाल,
ओठी न्यायाचा होता जयघोष;
विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर,
नतमस्तक झाला अन्यायाचा रोष..!

तरुणाई जेव्हा जागी होते,
सत्तेचे सिंहासनही हादरते;
सत्याच्या निर्धारापुढे,
खोटेपणाचे साम्राज्य कोसळते..!

ना सत्ता चिरंतन असते,
ना अन्यायाचा विजय असतो;
जनतेच्या प्रबळ विश्वासावर,
लोकशाहीचा श्वास टिकून असतो..!

संघर्ष हा व्यक्तीविरोधाचा नव्हे,
तो व्यवस्थेच्या शुद्धीकरणाचा होता;
जंतर-मंतरवरील प्रत्येक हुंकार,
नव्या भारताच्या स्वाभिमानाचा होता..!

तरुणांच्या लेखणीतून जेव्हा,
क्रांतीचे शब्द उमलू लागतात;
तेव्हा इतिहासाची पानेही,
नव्या युगाची नोंद करू लागतात..!

सत्य, न्याय आणि संविधान,
यांच्यावरच भारत उभा राहील;
जनतेच्या जागृत विवेकामुळे,
लोकशाहीचा दीप अखंड पेटत राहील..!

✍️ कवी - समाजमित्र नाशिकभाऊ चवरे
     मु. पिपरी (पुनर्वसन )त. जि. भंडारा. 
             8975916852

0 Response to "काव्य.. ज्वाला!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article