अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यावर अत्याचार.
मंगलवार, 7 जुलाई 2026
Comment
• गुन्हा दाखल न झाल्याने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
अकोला :- बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत आदिवासी समाजातील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव नामदेवराव सोळंके यांनी आज अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली.यावेळी आकाश दादा शिरसाट.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच आदिवासी समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनानुसार,राजंदा येथील रहिवासी वासुदेव सोळंके हे दोन एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी आहेत.शेजारील शेताच्या मोजणीदरम्यान सन २०१८ मध्ये संगनमताने त्यांच्या शेतातील सुमारे पाच गुंठे जमीन दुसऱ्याच्या ताब्यात गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर अनेक वेळा शेतमोजणी करून तसेच परस्पर सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो निष्फळ ठरल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
भूमिअभिलेख विभागाच्या आदेशानुसार ३ जुलै २०२६ रोजी महसूल अधिकारी व पोलीस बंदोबस्तात शेताची फेरमोजणी सुरू असताना संबंधित व्यक्तींनी मोजणीला विरोध करत वासुदेव सोळंके व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी धाव घ्यावी लागल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्यचे आकाश शिरसाट यांनी,आदिवासी समाजातील अल्पभूधारक कुटुंबावर अन्याय व अत्याचार होत असून प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिला.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते मयूर काळे,बाबू हिरोडे,सम्यक डोंगरे तसेच आदिवासी समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यावर अत्याचार."
एक टिप्पणी भेजें