बँक ऑफ बडोदाचा ११९ वा स्थापना दिन उत्साहात.
गुरुवार, 23 जुलाई 2026
Comment
• ग्राहकांचा सन्मान, मूकबधिर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची उधळण.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर ( प्रतिनिधी) :-देशाच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या बँक ऑफ बडोदाच्या श्रीरामनगर, तुमसर शाखेत ११९ वा स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्राहकसेवा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध उपक्रमांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला.
२० जुलै १९०८ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे दूरदृष्टीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली बँक ऑफ बडोदा आज देशाच्या कानाकोपऱ्यात विश्वासार्ह बँकिंग सेवेचे जाळे उभारून ११९ वर्षांहून अधिक काळ जनसेवेत कार्यरत आहे. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज, ट्रॅक्टर व कृषी अवजारे खरेदीसाठी कर्ज, सुवर्णतारण कर्ज, पेन्शन कर्ज, सोलर लोन, वाहन कर्ज, महिलांसाठी बचत योजना तसेच उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कर्जसुविधांद्वारे बँक आर्थिक प्रगतीला गती देत आहे.
स्थापना दिनानिमित्त श्रीरामनगर शाखा फुलांच्या सजावटीने आणि रंगीबेरंगी फुग्यांनी आकर्षकपणे सजविण्यात आली. महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाखेतील ग्राहक, पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना अल्पोपहार, मिठाई आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षरोपांचे वितरणही करण्यात आले. यानंतर सर्वांच्या उपस्थितीत भव्य केक कापून स्थापना दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत शाखेच्या वतीने स्थानिक मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना अल्पोपहार व मिठाईचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखाप्रमुख हंसराज टेंभुकर, शाखा व्यवस्थापक संजय नीमजे, विक्रम सोनुळे, त्रिनयना पांचपोंगले, रोहित रंगारी, योगेश बुरडे, नीता वासनिक, कुमाराज परतेती, सुवर्ण परीक्षक लक्ष्मीकांत वर्मा, आदित्य पोटभरे तसेच सचिन यांनी विशेष परिश्रम घेतले.
“विश्वास, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व” या त्रिसूत्रीच्या बळावर बँक ऑफ बडोदा ग्राहककेंद्री सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
0 Response to "बँक ऑफ बडोदाचा ११९ वा स्थापना दिन उत्साहात."
एक टिप्पणी भेजें