आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारे लोकशाहीर विठ्ठल उमप एक अष्टपैलू लोककलाकार.
गुरुवार, 16 जुलाई 2026
Comment
महाराष्ट्रातील थोर लोकशाहीर आणि अष्टपैलू लोककलाकार प्रसिद्ध लोककलावंत,लोकगायक,
गीतकार,नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कलावंत,गझल गायक विठ्ठल उमप यांना त्यांच्या दि.१५ जुलै २०२६ ला असलेल्या ९५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥..
लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा जन्म १९३१ सालातील जुलै महिन्याच्या १५ तारखेला मुंबईतील नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला.त्यांचे पूर्ण नाव विठ्ठल गंगाराम उमप.त्यांचे मूळ घराणे विदर्भातील होते.लहानपणापासूनच त्यांच्यावर वडिलांच्या भजनी गायनाचे व परंपरेचे गाढ संस्कार झाले होते.वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सुरु केले होते.विठ्ठल उमप यांना विश्वरत्न - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली होती;म्हणूनच त्यांनी आपले आयुष्य आंबेडकरी चळवळीला गतीने पुढे नेण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी समर्पित केले.
डॉ.बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान जनमानसात रुजवण्यासाठी त्यांनी "माझी वाणी भीमचरणी" आणि "माझी आई भीमाई" यांसारखी गीते लिहिली. लोकगीते आणि पथनाट्यांच्या भक्कम माध्यमातून त्यांनी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण केली.त्यांनी व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर आपल्या कलेचा प्रभावी वापर केला.त्यांच्या या कलेचा समाजमनावर फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत होता.त्यांनी अभिनयातून केलेल्या सादरीकरणाचा लोकांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडत होता.
विठ्ठल उमप हे केवळ शाहीर नसून एक उत्तम गायक,अभिनेता,कव्वाल आणि गीतकारही होते.त्यांनी रचलेली आणि गायन केलेली कोळीगीते व भीमगीते आजही संपूर्ण महाराष्ट्रात अजरामर आहेत.महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये त्यांना ' कोळीगीतांचे बादशहा' म्हणून गौरवाने आजही ओळखले जाते.त्यांचे 'जांभूळ,आख्यान' हे लोकनाट्य प्रचंड गाजले, त्याचे ५०० हून अधिक यशस्वी प्रयोग झाले. भारुड,गोंधळ,लावणी, पोवाडा आणि तुंबडी या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला त्यांनी जिवंत ठेवल्या कारण या सर्व लोककला ते आपल्या कार्यक्रमातून अतिशय चांगल्या प्रकारे दमदारपणे अभिनयातून सादरीकरण करीत होते.या सर्वांचा उपयोग त्यांनी आंबेडकरी चलवळ गतिमान करण्यासाठी केला.त्यांनी गायन केलेले 'माझी मैना गावाकडं राह्यली' आणि 'आला कागुद
कारभारणीचा' ही गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. त्यांनी सुमारे ५० वर्षे आकाशवाणीवर आणि ३० वर्षे व्यसनमुक्ती सप्ताह अंधश्रद्धा निर्मूलन,साक्षरता
प्रसार अशा विविध शासकीय प्रचार मोहिमांमध्ये अतिशय मोलाचे योगदान त्यांनी दिले.
सन-१९८३ मध्ये त्यांनी आयर्लंडमधील 'कॉर्क लोकोत्सव' गाजवून महाराष्ट्राच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.
विठ्ठल उमप यांनी लोकरंग भूमिकेसोबतच चित्रपट आणि नाटकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.त्यांनी त्यांच्या सर्व भूमिका फक्त मनोरंजनासाठी सादर केलेल्या नव्हत्या तर त्यांनी मनोरंजनातून समाजप्रबोधन फार मोठ्या प्रमाणात केले होते.
अभिनय सम्राट विठ्ठल उमप यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या.
डॉ.जब्बार पटेल दिग्दर्शित
'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये त्यांच्या अभिनय आणि लोककलेच्या कौशल्याचे दर्शन घडले.
'टिंग्या' या अत्यंत गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या (Best Actor) पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते.
'विहीर' या उमेश कुलकर्णी दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात त्यांनी अतिशय प्रभावी आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारली होती.
'नटरंग' या तमाशा आणि लोककलेवर आधारित असलेल्या चित्रपटातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
'गलगले निघाले' या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. पायगुण (१९८३), अन्यायाचा प्रतिकार (१९९३) या जुन्या चित्रपटांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या .'सुंबरान' या दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या या चित्रपटात त्यांनी एक विशेष भूमिका केली होती.
चित्रपटांशिवाय माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या Discovery of India या पुस्तकावर आधारित असलेल्या शाम बेनेगल यांच्या प्रसिद्ध 'भारत एक खोज' या दूरदर्शन मालिकेतही काम केले होते.
याशिवाय 'जांभूळ, आख्यान', 'खंडोबाचं, लगीन' आणि 'गढवाचं, लग्न'. यांसारख्या लोकप्रिय लोकनाट्यांमध्ये (वगनाट्य) त्यांनी मुख्य आणि अविस्मरणीय भूमिका केल्या होत्या.त्यांच्या भारदस्त आवाजामुळे आणि अचूक अंगविक्षेपामुळे त्यांचा अभिनय अत्यंत जिवंत वाटत असे.
लोककलेच्या अमूल्य सेवेसाठी विठ्ठल उमप यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा 'सांस्कृतिक पुरस्कार' देऊन त्यांच्या कलासाधनेचा गौरव करण्यात आला होता.संगीत नाटक अकादमी आणि इतर अनेक नामांकित संस्थांनी त्यांना जीवनगौरव* *पुरस्कार बहाल केले.
दि.२६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवरील एका कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेजवर सादरीकरण करतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
वयाच्या ७९ व्या वर्षी कला सादर करत असतानाच ते अनंतात विलिन झाले. कलावंताचा असा अंत अत्यंत दुर्मिळ मानला जातो.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ पोरकी झाली होती. महाराष्ट्राच्या लोककलेचा बुलंद आणि पहाडी आवाज कायमचा हरपला होता.त्यांचा हा समृद्ध लोकसंगीताचा, लोककलेचा, शाहिरीचा वारसा त्यांचे सुपुत्र नंदेश उमप हे अत्यंत समर्थपणे आज पुढे चालवत आहेत. नंदेश उमप हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय लोकगायक, अभिनेता आणि संगीतकार आहेत.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,त्यांची चळवळ गतिमान करण्यासाठी 'माझी वाणी भीमचरणी' आणि 'माझी आई भीमाई' ही प्रबोधनपर पुस्तके व गीते लिहिली. शासकीय संस्थांच्या माध्यमातून जनजागृती ३० वर्षे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,नशाबंदी मंडळ आणि महाराष्ट्र एड्स नियंत्रण मंडळ यांसारख्या शासकीय संस्थांच्या प्रचार मोहिमांमध्ये नेहमीच सहभाग घेतला.महाराष्ट्राच्या गावागावात लोकसंगीताचे कार्यक्रम सादर करून त्यांनी व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्यविषयक जनजागृतीचे मोठे सामाजिक कार्य केले. मुंबईतील कामगार वस्त्या आणि चाळींमध्ये कार्यक्रम सादर करून त्यांनी शोषित व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना आपल्या शाहिरीतून वाचा फोडली.मुंबईतील कोळीवाड्यात राहून तिथल्या संस्कृतीचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी अनेक अजरामर कोळीगीते रचली आणि त्या समाजाच्या लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. लोककलेचे जतन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य त्यांनी भारूड,गोंधळ, लावणी,कव्वाली आणि लोकनाट्य या मराठी लोककलांचे मूळ रूप जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर समाजप्रबोधनपर कार्यक्रम करीत राहिले.
लोकशाहीर - लोक कलाकार विठ्ठल उमप यांनी कलेला कधीही केवळ मनोरंजनाचे साधन मानले नाही, तर तिचा वापर समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रभावी शस्त्र म्हणून केला.त्यांच्या अथांग कलासाधनेमुळे आणि सामाजिक कार्यामुळे मराठी मनांमध्ये ते सदैव जिवंत राहतील. लोकशाहीर लोककलाकार विठ्ठल उमप यांच्या १५ जुलै २०२६ ला असलेल्या ९५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
लोकशाहीर - साहित्य, सम्राट अण्णाभाऊ साठे
. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
अमरावती.८०८७७४८६०९.
0 Response to "आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारे लोकशाहीर विठ्ठल उमप एक अष्टपैलू लोककलाकार."
एक टिप्पणी भेजें