मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याकडून प्रभाग निहाय 'SIR' मतदार नोंदणी शिबिरांची प्रत्यक्ष पाहणी व आढावा.
शुक्रवार, 17 जुलाई 2026
Comment
विजय चौडेकर,
"साप्ताहिक जनता की आवाज
नांदेड :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या देशभरात आणि राज्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) २०२६ चा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू आहे. या राष्ट्रीय मोहिमेच्या अंतर्गत नांदेड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवता यावे, चुका दुरुस्त करता याव्यात यासाठी प्रभाग निहाय विशेष 'SIR' कॅम्प्स (शिबिरे) आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिरांच्या पूर्वतयारीचा आणि सुरू असलेल्या प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी आज विविध प्रभागांमधील कॅम्पला अचानक भेटी दिल्या.
मनपा आयुक्तांनी शहरातील प्रमुख प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा, समाजमंदिरे आणि नियुक्त सरकारी इमारतींमधील 'SIR' कॅम्पला भेट दिली.यामध्ये प्रामुख्याने नरसिंह मंदिर कौठा व नरसिंह विद्यामंदिर व जय भिम नगर यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी प्रत्येक बाबींची बारकाईने तपासणी केली. प्रत्येक केंद्रावर बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO), पर्यवेक्षक आणि मदतनीस वेळेत हजर आहेत की नाही याची खात्री केली. तसेच केंद्रांवर आलेल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या शंकेचे निरसर करतांना आपले गणना प्रपत्र लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन केले.
सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांनी कॅम्पव्दारे जास्तीत जास्त गणना प्रपत्रांचे संकलन व संगणकीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करावेत व मनपाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे असे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले. तसेच पावसाळ्याचे दिवस पाहता शिबिराच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी जागा, पिण्याचे पाणी आणि छताची योग्य व्यवस्था असावी, अशा सुचना यावेळी पालिका आयुक्तांनी केल्या.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
महानगरपालिका प्रशासनातर्फे नांदेडच्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या बीएलओशी संपर्क साधुन आपले गणना प्रपत्र भरुन जमा करावे किंवा आपल्या प्रभागातील जवळच्या 'SIR' कॅम्पला भेट देऊन गणना प्रपत्राच्या संकलनाची व संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आणि शुध्द मतदार यादी तयार होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपायुक्त नितीन गाढवे, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, संबंधित सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, संबंधित प्रभागांचे क्षेत्रिय अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
0 Response to "मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याकडून प्रभाग निहाय 'SIR' मतदार नोंदणी शिबिरांची प्रत्यक्ष पाहणी व आढावा."
एक टिप्पणी भेजें