रावणवाडी येथे आढळला अतिशय दुर्मिळ बांबू पिट व्हायपर साप व दुर्मिळ प्रजातीचा बेडूक..
मंगलवार, 4 अगस्त 2026
Comment
• ग्रीन नेचर फाउंडेशन लाखनी व अड्याळ, नागपूर, उमरेड, ओडिशा, तामिळनाडू येथील सर्पमित्रांचे परिश्रम आले कामी
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी येथील ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र व सरीसृप संशोधकातर्फे अनेक दुर्मिळ सापांचा, सरपटणारे प्राणी यात विशेषतः पाल व सरडे व सोबतच उभयचर प्राणी, बेडूक यांच्या व पक्षीमित्रातर्फे नवीन स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचा शोध लावून भंडारा गोंदिया जिल्ह्यात जैवविविधतेत अधिक भर घालण्यात येत आहेत.
याच मोहिमेअंतर्गत लाखनीचे सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, दर्वेश दिघोरे पोहरा, आशिक नैतामे अड्याळ, भंडाऱ्याचे रजत घुगुसकर व तसेच नागपूर येथील निसर्ग संशोधक सागर व्होरा, ओडिशाचे मत्स्य संशोधक हितेश नाईक व भूशास्त्रअभ्यासक तुषारकांत राणा , तामिळनाडू येथील मत्स्य संशोधक साथारिया प्रभाकरन व उमरेडचे सर्पमित्र जयेश भुसारी हे निसर्ग संशोधक सहभागी झाले होते.
यावेळी सर्वांना सायंकाळी रावणवाडी परिसरातील रोडच्या बाजूला सर्वे करीत फिरत असतांना एका ठिकाणी पोपटी रंगाचा सापाची हालचाल फांदीवर जाणवली. अर्थात त्यांसर्वांनी लगेच ओळखले की हा एकदमच दुर्मिळ असा बांबू पिट व्हायपर अर्थात विषारी चापडा साप आहे याची जाणीव त्यांना झाली.
यापूर्वी भंडारा जिल्ह्यात अड्याळचे सर्पमित्र रोशन नैतामे यांना मेलेल्या अवस्थेत सापडला होता तसेच एकदा वर्धा जिल्ह्यातील सर्पमित्रांना जिवंत सापडला. त्याचबरोबर त्या रात्रीच्या सरीसृप सर्वेमध्ये त्यांना दुर्मिळ प्रकारातील टर्माईट हिल फ्राग व पेंटेड बलुन फ्रॉग हे दोन्ही फ्रॉग त्यांना आढळले.याशिवाय याच सर्वेमध्ये त्यांना ब्राँझ बॅक ट्री स्नेक अर्थात डोंगरवेल्या साप व चेकर्ड किल बॅक अर्थात पाणदिवड साप, एक स्कॉर्पिओन व एक पार्कूपाईन साळिंदर आढळले. मत्स्य संशोधकांनी दुर्मिळ मत्स्य प्रजाती सुद्धा त्यांनी या सर्वेत शोधून काढल्या.बऱ्याच वर्षाने विदर्भातच नाही तर भंडारा जिल्ह्यात हा अत्यंत दुर्मिळ विषारी चापडा सापडल्याने सर्पमित्रामध्ये एकच आनंदाची लहर पसरली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी यापूर्वी भंडारा जिल्ह्यात कधीही न आढळणारा सॉ स्केल्ड व्हायपर अर्थात फुरसे सापाचा शोध आठ वर्षापूर्वी लावला होता .
या चापडा सापाबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की याचे शास्त्रीय नाव ट्रायमेरेसूरज स्टेजनेगेरी असून जहाल विषारी आहे. याने सर्पदंश केलेल्या जागेचा व आजूबाजू जागेचा मास काळा निळा करून सडवितो. याला पानासारखा हिरवा रंग असल्याने हा झाडामध्ये विशेषकरून बांबूच्या झाडामध्ये सहज लपतो.म्हणून याला मराठीत हिरवा चापडा असे सुद्धा म्हणतात.महाराष्ट्रात पश्चिम घाटात याचा सर्वत्र वावर असून विदर्भात मात्र फार कमी एकदमच तुरळक नोंदी सापडल्या आहेत.ग्रीन नेचर फाउंडेशनचे सर्पमित्र पंकज भिवगडे, मयूर गायधने, सलाम बेग, नितीन निर्वाण, गगन पाल, खेमराज हुमे , धनंजय कापगते व ग्रीनफ्रेंडसचे सर्व पदाधिकारी अशोक वैद्य, भैय्याजी बावनकुळे, अशोक नंदेश्वर आणि इतर सर्पमित्र व पदाधिकारी यांनी संपूर्ण सरीसृप संशोधक चमूंचे अभिनंदन केले आहे.
लाखनी साकोली येथील सर्पमित्रांना मागील २२ वर्षांत यापूर्वी अत्यंत दुर्मिळ फास्टेन कॅट स्नेक, ऑलिव्हस किल बॅक अर्थात तास्या साप, पोवळा तसेच काळडोक्या साप व ईतर अनेक दुर्मिळ आल्बिनो प्रकारातील विविध प्रजातीचे साप याचबरोबर अनेक नवीन पाल व सरडे यांचा शोध नव्याने लावलेला आहे. त्यात आता विषारी हिरवा चापडा अर्थात बांबू पिट व्हायपर ची भर पडल्याने सर्वांनी सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, सागर व्होरा, हितेश नाईक, तुषारकांत राणा, साथरिया प्रभाकरन, जयेश भुसारी, रजत घुगुसकर, आशिक नैतामे, दर्वेश दिघोरे या चमूचे अभिनंदन केले आहे. लवकरच त्यांनी रिसर्च जर्नल या शोधपत्रिकेत त्यावर रिसर्च पेपर तयार करुन संशोधन पत्रिका प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस व्यक्त केला आहे.
0 Response to "रावणवाडी येथे आढळला अतिशय दुर्मिळ बांबू पिट व्हायपर साप व दुर्मिळ प्रजातीचा बेडूक.."
एक टिप्पणी भेजें