राज महाडिक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!.
रविवार, 16 अगस्त 2026
Comment
• कुर्ला कॅम्पमधील धोकादायक विद्युत जोडणी हटवून कायमस्वरूपी काम पूर्ण.
सोनु संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- कुर्ला कॅम्प येथील कालीमाता मंदिर ते समता नगर चौक परिसरात अनेक दिवसांपासून धोकादायक तात्पुरत्या विद्युत जोडणीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. अखेर युवा सेना (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर संबंधित यंत्रणेला जाग आली असून आज त्या ठिकाणी कायमस्वरूपी आणि सुरक्षित विद्युत जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले.
या प्रकरणी राज महाडिक यांनी २७ जुलै २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने तात्पुरत्या स्वरूपात वायरिंग करून काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र झाडाला बांधलेल्या विद्युत तारा आणि टेपच्या साहाय्याने करण्यात आलेली जोडणी पाहून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. पावसाळ्यात ही जोडणी कधीही तुटून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.
दिलेल्या आश्वासनानंतरही कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने राज महाडिक यांनी पुन्हा आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधले. तसेच जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती.
या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आणि आज संबंधित ठिकाणी सुरक्षित व कायमस्वरूपी विद्युत जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना राज महाडिक म्हणाले, "हा कोणत्याही व्यक्तीचा विजय नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा विजय आहे. लोकांच्या जीवाशी संबंधित प्रश्नांवर आम्ही यापुढेही ठामपणे आवाज उठवत राहू. प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर नागरिकांना एवढे दिवस धोक्यात राहावे लागले नसते."
परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाचे आभार मानताना भविष्यात अशा प्रकारचे तात्पुरते आणि धोकादायक उपाय टाळून सुरुवातीपासूनच दर्जेदार व सुरक्षित कामे करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
'जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रशासनालाही कारवाई करावी लागते,' हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
0 Response to "राज महाडिक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!."
एक टिप्पणी भेजें