कांद्रीच्या बाजार चौकात उत्साहात सार्वजनिक बैलपोळा उत्सव.
गुरुवार, 10 सितंबर 2026
Comment
• प्रमेशभाऊ नळलगोपुलवार यांच्या वतीने बैलजोडी मालकांचा दुपट्टा देऊन सन्मान.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
कांद्री :- शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक असलेला बैलपोळा उत्सव कांद्री येथील बाजार चौकात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. सार्वजनिक पोळ्याच्या निमित्ताने परिसरातील बैलजोडी मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रमेशभाऊ नळलगोपुलवार यांच्या वतीने सर्व बैलजोडी मालकांना दुपट्टे देऊन सन्मान करण्यात आला.
बैलपोळा हा ग्रामीण संस्कृतीतील महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतीकामात खांद्याला खांदा लावून मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. कांद्री येथील सार्वजनिक पोळ्यातही याच परंपरेचे दर्शन घडले. सजवलेल्या बैलजोड्या, पारंपरिक पोळ्याचा उत्साह आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती यामुळे बाजार चौकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बैलजोडी मालकांचा दुपट्टा देऊन सन्मान करताना प्रमेशभाऊ नळलगोपुलवार यांनी शेतकरी, बैल आणि ग्रामीण संस्कृती यांचे नाते जपणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, आधुनिक काळातही या पारंपरिक सणाचे महत्त्व कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सार्वजनिक पोळा उत्सवाला प्रभाकरजी बारई, दिनेशजी बालपांडे, ग्रामपंचायत सदस्य आशिष टेकाम, विनोदजी पटले, विलास बालपांडे, प्रकाशजी निमकर, चंद्रशेखरजी कारेमोरे, शेखर बडवाईक, गोलू कुलरकर, शुभमजी बालपांडे, विजयजी निमकर, सुरजजी चौधरी, गुरुदास गलबले यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, बैलजोडी मालक, शेतकरी बांधव आणि समस्त ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून त्यांना सजविण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक पोळ्यात बैलजोड्यांचे आगमन झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलजोडी मालकांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवन आणि पशुधनाप्रती कृतज्ञता जपणारा हा सार्वजनिक बैलपोळा उत्सव कांद्री येथे एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा सार्वजनिक पोळा उत्सव उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
0 Response to "कांद्रीच्या बाजार चौकात उत्साहात सार्वजनिक बैलपोळा उत्सव."
एक टिप्पणी भेजें