जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या !
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू असताना भंडारा जिल्ह्यातील विविध मतदार संघांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतुन केला आहे.
प्रकाशित मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाच्या रकान्यात शुन्य नमूद करण्यात आले असून, काही ठिकाणी घर क्रमांकाऐवजी थेट गावाचे नाव नमूद असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा वाघमारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच घर क्रमांकावर ५०, ७०, ८०, तर काही ठिकाणी जवळपास १०० मतदारांची नोंद असल्याचेही दिसुन आल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हाधिकारी व निवडणुक विभागाने याची दखल घेवुन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रारूप याद्यांची स्वतंत्र फेरपडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात वाघमारे यांनी भंडारा जिल्हाधिकारी मतदार याद्यांमध्ये 'शुन्य' घर क्रमांकएकाच घरात ५० ते १०० मतदारांची नोंद प्रारूप मतदार यादीच्या फेरपडताळणीची मागणी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांना निवेदनसुध्दा दिले आहे.
मतदार यादी पुनर्रचनेच्या प्रकि येत बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात 'बिएलओ' यांच्यावर मतदारांची माहिती व पत्त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची जबाबदारी असते, मात्र, प्रारूप यादीत घर क्रमांक शुन्य, घर क्रमांकाच्या जागी गावाचे नाव किंवा एका घर क्रमांकावर असामान्य संख्येने मतदारांची नावे आढळत असल्याने संबंधित मतदारांच्या पत्त्याची प्रत्यक्ष पडताळणी नेमकी कशा पद्धतीने झाली, असा सवाल वाघमारे यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून हरकत किंवा दुरुस्ती सुचविण्याची संधी दिली जाते. मात्र, सामान्य मतदार प्रामुख्याने मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, नावातील स्पेलिंग योग्य आहे की नाही, एवढेच तपासतात. आपल्या नावासमोर चुकीचा घर क्रमांक नमूद आहे किंवा घर क्रमांकाच्या रकान्यात गावाचे नाव आले आहे, यासारख्या तांत्रिक बाबी त्यांच्या लक्षात येतीलच याची निश्चिती नसल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे एखाद्या मतदाराने चुकीच्या घर क्रमांकाबाबत हरकत घेतली नाही, म्हणून संबंधित नोंद योग्य असल्याचे गृहीत धरू नये. प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या स्पष्ट त्रुटींची स्वतःहून दखल घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्व संबंधित मतदान केंद्रांच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रशासकीय स्तरावर फेरपडताळणी करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली असुन विशेषतः 'घर क्रमांक शुन्य असलेले तसेच घर क्रमांकाच्या रकान्यात गावाचे नाव तसेच एकाच घर क्रमांकावर असामान्य प्रमाणात मतदारांची नोंद असलेल्या यादींची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे. तसेच संबंधित बीएलओ यांनी केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीची नोंद उपलब्ध असल्यास तिची तपासणी करावी आणि गरज भासल्यास संबंधित भागात पुन्हा प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी करावी, असेही ते म्हणाले. मतदार यादीतील अचूकता ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची बाब असल्याने केवळ नागरिकांच्या हरकतींवर अवलंबून न राहता प्रशासनानेही स्पष्टपणे निदर्शनास आलेल्या त्रुटींची दखल घ्यावी, अशी मागणी वाघमारे यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेला चरण वाघमारे यांच्यासह राकॉ. सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, भंडारा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मधुकर चौधरी आदि उपस्थित होते.
0 Response to "जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या !"
एक टिप्पणी भेजें