-->
खैरी-वलमाझरीतील घटनेने साकोली तालुका हादरला; सरपंच पुरुषोत्तम रुखमोडेच्या अटकेसाठी वंचित बहुजन आघाडीचा एल्गार.

खैरी-वलमाझरीतील घटनेने साकोली तालुका हादरला; सरपंच पुरुषोत्तम रुखमोडेच्या अटकेसाठी वंचित बहुजन आघाडीचा एल्गार.


        संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 भंडारा :- लोकशाहीत हक्काची मागणी करणे आणि नागरी समस्या मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, मात्र साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी येथे याच मागणीवरून सत्तेचा माज दाखवत एका निष्पाप वृद्धाचा बळी घेण्यात आल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. घरासमोरील ग्रामपंचायतीची नाली साफ करून देण्याच्या अगदी क्षुल्लक मागणीवरून झालेल्या वादात, गावचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी ५६ वर्षीय दिलीप सदाशिव कांबळे यांना मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात अखेर मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप कांबळे यांची सोमवार, २१ सप्टेंबर रोजी प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण साकोली तालुक्यासह खैरी-वलमाझरी परिसरात प्रचंड तीव्र असंतोषाची लाट उसळली असून, एका सामान्य नागरिकाच्या मृत्युने संपूर्ण परिसराचे जनजीवन सुन्न झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिलीप कांबळे हे गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर अत्यंत शांततेने आपल्या घरासमोरील नाली साफ करण्याची मागणी करत होते. परंतु, लोकप्रतिनिधी असणाऱ्या सरपंचाला या मागणीचा इतका राग आला की, ११ सप्टेंबरच्या सायंकाळी ६.३० च्या सुमारास खैरी-आमगाव रोडवर पोलीस पाटलांच्या घरासमोर यावरून तीव्र वाद झाला. कांबळे यांच्या मुलाने विचारणा केली असता, सरपंचाने त्याला आधी बेदम चोप दिला. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिलीप कांबळे यांच्यावर सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे याने अमानुष हल्ला चढवला. या हल्ल्यात कांबळे यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि घटनास्थळी रक्ताचा सडा पडला. एवढ्यावरच न थांबता, पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची आणि संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची उघड धमकी देऊन या प्रकरणी दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

​मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या दिलीप कांबळे यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर भंडारा सामान्य रुग्णालय आणि अखेर नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, नराधम सरपंचाच्या मारहाणीचा फटका इतका भीषण होता की, अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशासकीय निष्काळजीपणा आणि सरपंचाच्या अरेरावीमुळे एका निरपराध वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सत्तेच्या आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत असून, सत्ताधाऱ्यांच्या दहशतीविरोधात आता जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

​या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण परिसरात उमटले असून, वंचित बहुजन आघाडी आणि स्थानिक आंबेडकरवादी संघटनांनी या अन्यायाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे याला कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी तातडीने अटक करून त्याच्यावर खुनाचा आणि कठोर कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. "जर पोलिसांनी राजकीय दबाव बाजूला सारून निष्पक्ष तपास केला नाही आणि नराधम सरपंचाच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी संपूर्ण साकोली तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडून रस्ते जाम करेल, असा थेट आणि कडक इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात की राजकीय दबावापुढे झुकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 Response to "खैरी-वलमाझरीतील घटनेने साकोली तालुका हादरला; सरपंच पुरुषोत्तम रुखमोडेच्या अटकेसाठी वंचित बहुजन आघाडीचा एल्गार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article