-->
पोळ्याच्या बैलांच्या शिंगांवरही झळकली बोनसची मागणी.

पोळ्याच्या बैलांच्या शिंगांवरही झळकली बोनसची मागणी.



• रयत शेतकरी संघटना लाखांदूर तालुक्याचा शासनाला इशारा.

'बैल पोळ्या' त बैलांच्या शिगांवर झळकले 'बोनस' चे..., बॅनर !
युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
लाखांदूर :- धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा प्रश्न प्रलंबित असल्याने लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळून तात्काळ बोनस द्यावा, या मागणीसाठी रयत शेतकरी संघटनेने लाखांदूर तालुक्यातून आवाज बुलंद केला आहे. संघटनेचे लाखांदूर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त शेतकरी बांधवांनी पोळ्याच्या सणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.

लाखांदूर तालुक्यातील २० ते २५ गावांम पोळ्यानिमित्त बैलांच्या शिंगांवर व पाठीवरून तसेच बॅनरच्या माध्यमातून 'शेतकऱ्यांना बोनस द्या' असा संदेश देण्यात आला. शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सण असलेल्या पोळ्यातूनच शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम रयत शेतकरी संघटनेने राबविला.

शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना उत्पादन खर्चात सातत्याने वाढ, नैसर्गिक संकटे आणि वाढता आर्थिक ताण यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत धान बोनस हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार ठरू शकतो. त्यामुळे केवळ आश्वासनांवर प्रश्न प्रलंबित न ठेवता शासनाने बोनसची ठोस घोषणा करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी भूमिका रयत शेतकरी संघटनेने ठामपणे घेतली आहे.

रयत शेतकरी संघटना, लाखांदूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त शेतकरी बांधवांकडून शासनाकडे एकमुखी मागणी करण्यात येत आहे की, धान बोनसबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा न्याय्य हक्क असून, बोनसचा प्रश्न केवळ आश्वासनापुरता न ठेवता शासनाने प्रत्यक्ष निर्णय घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. (ता.प्र.)

'शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष बोनस हवा. शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ बोनस जाहीर करावा आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. पोळ्याच्या सणाला बैलांच्या शिंगांवरून आम्ही मांडलेली बोनसची मागणी ही शेतकऱ्यांच्या मनातील असंतोषाची हाक आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळाल्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार नाही.'

ज्ञानेश्वर राऊत

बैलांच्या शिंगांवरून शासनाकडे थेट बोनसची मागणी....

पोळ्याच्या सणात बैलांच्या शिंगांवर झळकलेली 'शेतकऱ्यांना बोनस द्या' ही मागणी आता गावागावातील शेतकऱ्यांच्या भावनेचा आवाज बनली आहे. 'पोळा बैलांचा; पण हाक शेतकऱ्यांच्या हक्काची!' या भूमिकेतून रयत शेतकरी संघटनेने बोनसच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. धान बोनसचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट निगडित आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता दिलेला शब्द पाळावा, बोनस जाहीर करावा आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

0 Response to "पोळ्याच्या बैलांच्या शिंगांवरही झळकली बोनसची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article