-->
पालांदूर-निमगाव मार्गावर २५ किलो गांजा जप्त!

पालांदूर-निमगाव मार्गावर २५ किलो गांजा जप्त!


एएनटीएफ नागपूरची पहाटे कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे गजाआड.

            नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक"जनता की आवाज" 

पालांदूर :- ओरिसा-छत्तीसगडमधून नागपूरच्या दिशेने नेला जात असलेला तब्बल २५.४० किलो गांजा एएनटीएफच्या नागपूर पथकाने पालांदूर-निमगाव मार्गावर छापा टाकून जप्त केला. बुधवारी (२३ सप्टेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जप्त गांजाची अंदाजे किंमत पाच लाख रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४०, सीएम ६७७९ क्रमांकाच्या आयसर ट्रकमधून तांदळाचा भुसा (कोंडा) वाहून नेला जात होता. हा ट्रक संबलपूर (ओरिसा)-छत्तीसगडमार्गे नागपूरकडे रवाना झाला होता. गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एएनटीएफ पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकवर लक्ष ठेवत त्याचा पाठलाग सुरू केला.

दरम्यान, लाखनी तालुक्यातील मानेगाव परिसरातून भुसा खाली करण्यासाठी ट्रक पालांदूर-निमगाव मार्गावर थांबला. पहाटे साडेचारच्या सुमारास एएनटीएफ पथकाने ट्रकची झडती घेतली. ट्रकच्या केबिनच्या पुढील भागावर दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये संशयास्पद साहित्य आढळले. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे समोर आले.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पंचांसमक्ष तपासणी केल्यानंतर दोन्ही पोत्यांमध्ये २५ किलो ४०० ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गांजा व ट्रक ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी गुलाम वजीद (महाकाली नगर, मानकापूर, नागपूर) आणि ट्रकचालक शेख सहबाज शेख (कपिल नगर, नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे. पालांदूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय कडू, पोलीस हवालदार राजू गया, प्रसाद वर्मा, प्रशांत सलाम, चालक नितुल सावजी व विवेक हिरुडकर यांच्या पथकाने केली.फोटो ओळ : पालांदूर-निमगाव मार्गावर एएनटीएफ पथकाने जप्त केलेला गांजा व आयसर ट्रक.
छाया.

0 Response to "पालांदूर-निमगाव मार्गावर २५ किलो गांजा जप्त!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article