-->
सिमेंट रस्ता फोडून सांडपाणी कच्च्या नालीत सोडण्याचा प्रयत्न.

सिमेंट रस्ता फोडून सांडपाणी कच्च्या नालीत सोडण्याचा प्रयत्न.


• विरली बु. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात!.

• ग्रामस्थांचे ​गटविकास अधिकाराऱ्यांना निवेदन.

संजीव भांबोरे 
साप्ताहिक"जनता की आवाज"
 
​भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील पूर्वीच्या वैयक्तिक वादाचा राग मनात धरून, ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी वा ठराव नसताना शासनाचा लाखो रुपयांचा सिमेंट रस्ता अनधिकृतपणे फोडून सांडपाणी कच्च्या नालीत सोडण्याचा धक्कादायक प्रकार विरली (बु.) येथील हनुमान टोली परिसरात समोर आला आहे.

 या मनमानी व बेकायदेशीर कृत्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून हे अवैध काम तात्काळ बंद करण्यात यावे.या मागणीसाठी अर्जदार वैशाली भुरे यांच्यासह संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पं स. लाखांदूर यांना २९ सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.
 प्राप्त निवेदनानुसार, अर्जदार वैशाली भुरे या विरली (बु.) येथील हनुमान टोली परिसरात कायमस्वरूपी रहिवासी आहेत. त्यांच्या पूर्वेकडील घराशेजारून सार्वजनिक रस्ता असून, पावसाचे व परिसरातील नैसर्गिक पाणी वाहून जाण्यासाठी तेथे एक कच्ची नाली आहे.

 दरम्यान, रस्त्याच्या विरुद्ध बाजूला (पश्चिमेस) राहणारे शंकर सावरबांधे व रामेश्वर सावरबांधे यांचा या नालीशी कुठलाही थेट संबंध येत नाही. तरीही जुन्या वैयक्तिक वादातून हेतुपुरस्सर, गावातील शांतता व आरोग्य धोक्यात आणण्याच्या उद्देशाने त्यांनी शासनाचा लाखो रुपये खर्चून तयार केलेला सिमेंट रस्ता परस्पर फोडला.

गैरअर्जदारांकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करून आपल्या घरातील दूषित व घाण सांडपाणी या कच्च्या नालीत सोडण्याचा आटापिटा सुरू आहे. याविषयी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिवांशी संपर्क साधला असता, अशा प्रकारे रस्ता फोडण्याची किंवा सांडपाणी सोडण्याची कोणतीही परवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिलेले नाही, अशी स्पष्ट माहिती समोर आली आहे.

कायद्यानुसार व आरोग्याच्या दृष्टीने गैरअर्जदारांनी स्वतःच्या घराचे सांडपाणी जिरवण्यासाठी स्वतःच्या जागेत शोषखड्डा तयार करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रशासकीय नियमांची व सार्वजनिक आरोग्याची उघडपणे पायमल्ली करत गैरअर्जदार बळजबरीने रस्ता खोदून उघड्या कच्च्या नालीत सांडपाणी सोडत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

शासकीय निधीतून उभारलेल्या सिमेंट रस्त्याची नासधूस करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणाऱ्या गैरअर्जदारांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे बेकायदेशीर काम तातडीने थांबवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

0 Response to "सिमेंट रस्ता फोडून सांडपाणी कच्च्या नालीत सोडण्याचा प्रयत्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article