-->
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक!.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक!.




साप्ताहिक"जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

तिरोडा :- तलाठी पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट प्रतीक्षा यादी व ई-मेलच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपींनी पाच लाख रुपयांचा धनादेश घेतल्याचा आरोप आहे. हा प्रकार १८ मार्च २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पृथ्वीराज रामचंद्र मेश्राम (वय ६५, सेवानिवृत्त बँक शाखा व्यवस्थापक, रा. विनोबा भावे वॉर्ड, तिरोडा) यांच्या मुलाला २०२३ मधील तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपी ईश्वरदास दयाराम राऊत (वय ५४, रा. राजेंद्र वॉर्ड, मोहाडी, जि. भंडारा) याने दिले. त्यानंतर त्याने टेकचंद बाळा भरें (वय ५३, रा. वाडा फुटाळा, ता. मोहाडी) याची ओळख करून दिली. पुढे टेकचंद भरें याने नितीन वसराम राठोड (वय ४५, रा. मुंबई) याची ओळख करून दिली.

दरम्यान, तिन्ही आरोपींनी संगणमत करून तलाठी पदाची नोकरी लावून देण्याचे सांगितले. नोकरी न लागल्यास पैसे परत करण्याचे आश्वासन देत एकूण २२ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी सुरवातीला पाच लाख रुपये देण्यास सांगितल्याने फिर्यादी पृथ्वीराज मेश्राम यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, तिरोडा शाखेच्या खात्याचा पाच लाख रुपयांचा धनादेश आरोपींना दिला.

त्यानंतर आरोपींनी दोन महिन्याने बनावट प्रतीक्षा यादी तयार करून त्यामध्ये नाव असल्याचे दाखविले. तसेच भेटीसाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बनावट ई-मेल आयडीवरून संदेश पाठवून कागदपत्रे पडताळणी करण्यास सांगितले. मात्र, नियुक्तीपत्रही दिले नाही. तसेच पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पृथ्वीराज मेश्राम यांनी शुक्रवारी (ता. २) पोलिसात तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील करीत आहेत

0 Response to "नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article