-->
कुठलेही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तयारीत सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे .

कुठलेही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तयारीत सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे .


 
• ‘ऑफिसर्स टॉक’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचे प्रतिपादन.

           नरेंद्र मेश्राम
 साप्ताहिक "जनता की आवाज"
 
भंडारा :- स्पर्धा परीक्षेत आपले लक्ष्य ठरवणे आणि ते प्राप्त करण्यासाठी तयारीत सातत्य आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करणे महत्वाचे असते. सातत्य कायम ठेवून कोणीही यामध्ये मोठे यश मिळवू शकतो. यासाठी शालेय वयापासून नियमित वाचन, लेखन आणि बोलणे ही कौशल्य महत्वाची आहेत, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले.
भंडारा पोलिस दिशा प्रकल्प आणि स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या. वतीने आयोजित ‘ऑफिसर्स टॉक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. स्पर्धा परीक्षा, करिअर आणि प्रशासकीय सेवांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच यशस्वी अधिकाऱ्यांचा थेट संवाद विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे तंत्र व नियोजन, ‘प्लॅन बी’ आणि एकविसाव्या शतकातील आव्हाने अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये यांनी नूरुल हसन यांच्याशी संवाद साधला. 

• कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
 
या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा, पोलीस निरीक्षक सचिन पवार, जिल्हा परिषद सदस्या डॉ. स्वाती वाघाये, लाखनी पं. स. सभापती अश्विनी मोहतुरे उपस्थित होते.

ऑफिसर्स टॉक या कार्यक्रमात नुरुल हसन यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासापासून यूपीएससीची तयारी, आयपीएस म्हणूनचा अनुभव, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांसमोरील विविध आव्हाने अशा विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास अर्धा तास विविध शाळा, महाविद्यालये आणि अभ्यासिकांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 
 "तंत्रज्ञानाचा योग्य वापर महत्वाचा"
 
आज २१ व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे, त्यामुळे जगभरातील माहिती उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टी अभ्यासात खूप महत्वाच्या आहेत. मात्र त्याचा योग्य पद्धतीने वापर खूप महत्वाचा आहे. योग्य पद्धतीने हे तंत्रज्ञान वापरले तर खूप फायदेशीर आहे मात्र चुकीच्या पद्धतीने वापरले तर ते धोकादायक देखील आहे, त्यामुळे उपलब्ध संसाधनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे, तसे केल्यास सर्वांचा फायदा आहे, असेही नूरुल हसन म्हणाले. 
 "नियमित वर्तमानपत्र वाचन महत्वाचे"

कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयार करताना अभ्यास करणे महत्त्वाचे आहेच. मात्र लहानपणापासून नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे खूप महत्त्वाचे असते. महत्त्वाची माहिती दररोज वर्तमानपत्रात येत असते. नियमित वर्तमानपत्र वाचनामुळे ताज्या घडामोडी, सामान्य ज्ञान या बाबी कळत असतात. विविध लेख, वैज्ञानिक माहिती आणि इतर माहितीपर गोष्टी देखील असतात. सोबतच स्पर्धा परीक्षा देताना शक्यतो व्यावसायिक पदवी मिळवा, समाज माध्यमांचा वापर मर्यादित आणि चांगल्या गोष्टींसाठी करा, अभ्यास करताना वाचन, चिंतन करा, चांगल्या पद्धतीने बोलायला, संभाषण करायला शिका, असाही संदेश नूरुल हसन यांनी दिला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंगेश बेहलपांडे यांनी केले. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर भीष्म लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पोलिस प्रशासन, दिशा प्रकल्प टीम तसेच स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी सुधीर काळे, लिखित पुडके, दुर्गेश टिचकले, अनिकेत नगरकर, पवन वंजारी, निखिल काळे यांनी परिश्रम घेतले.

0 Response to "कुठलेही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तयारीत सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article