-->
सायकलच्या चाकांवर बहुजनांच्या राजकीय स्वाभिमानाचा इतिहास लिहिणारा महामानव- परमानंद मेश्राम

सायकलच्या चाकांवर बहुजनांच्या राजकीय स्वाभिमानाचा इतिहास लिहिणारा महामानव- परमानंद मेश्राम

दुर्मिळ फोटो 

संजीव भांबोरे 
साप्ताहिक "जनता की आवाज"
 
भंडारा :- या देशातील हजारो वर्षे उपेक्षित, शोषित, वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला केवळ मतदार म्हणून नव्हे, तर सत्तेतील भागीदार म्हणून उभे करण्याचे ऐतिहासिक स्वप्न पाहणारा आणि त्या स्वप्नासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा महामानव म्हणजे मान्यवर कांशीराम साहेब.
सायकलवरून गावोगाव फिरत, संपूर्ण देश पिंजून काढत, बहुजन समाजाच्या मनामनात राजकीय स्वाभिमानाची ज्योत पेटविणाऱ्या या महापुरुषाचा संघर्ष थक्क करणारा आहे. बामसेफ, डीएस 4 आणि पुढे बहुजन समाज पक्षाच्या निर्मितीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा भारतीय राजकीय इतिहासातील एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अध्याय आहे.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून त्यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आव्हान दिले.

बाबासाहेबांचे विचार समाजाच्या शेवटच्या. घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले.स्वतःसाठी काहीही न मागता बहुजन समाजाच्या हातात सत्तेच्या चाव्या देण्यासाठी आयुष्य खर्ची घातले.मी आज बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता नाही. मात्र याचा अर्थ मी मान्यवर कांशीराम साहेबांचा त्याग, संघर्ष आणि समर्पण विसरावा, असा कदापि होऊ शकत नाही. असा कृतघ्न विचार माझ्या मनाला स्पर्शही करू शकत नाही. 

कारण राजकीय पक्षाशी असलेली बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.मात्र आज मनाला वेदना होतात. ज्या राजकीय मूल्यांसाठी साहेबांनी आयुष्य वेचले, ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर त्यांनी बहुजन मुक्तीच्या कारवाँची जबाबदारी सोपविली, त्या विचारांची आणि मूल्यांची आजची अवस्था पाहून अस्वस्थ व्हायला होते.साहेबांनी पाहिलेले स्वप्न केवळ एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री किंवा सत्ताधीश बनविण्याचे नव्हते. ते स्वप्न होते संपूर्ण बहुजन समाजाला राजकीय सत्तेत सन्मानाची भागीदारी मिळवून देण्याचे. ज्यांच्यावर साहेबांनी विश्वास टाकला, त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिका आणि विचारांपासून होत असलेली फारकत पाहताना एक प्रश्न मनाला छळतो.

ज्या महापुरुषाने स्वतःचे आयुष्य संपवून बहुजनांचा राजकीय कारवाँ उभा केला, त्या कारवाँचे पुढे काय झाले आणि त्याला कुठे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे.तरीही माझ्या मनातील आशा संपलेली नाही. या देशात बहुजन समाज पक्षासारखी फुले, शाहू, आंबेडकरांच्या तत्त्वांवर चालणारी राजकीय शक्ती पुन्हा बहरावी. बहुजन समाज संघटित व्हावा. सत्तेच्या चाव्या बहुजनांच्या हातात याव्यात आणि साहेबांनी पाहिलेले सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.

कारण कांशीराम साहेब हा केवळ एका पक्षाचा इतिहास नाही, तर बहुजनांच्या राजकीय स्वाभिमानाचा जिवंत दस्तऐवज आहे.साहेबांच्या स्मृतिदिनी केवळ त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांनी दिलेला विचार, उभारलेली चळवळ आणि दाखविलेली दिशा जिवंत ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.साहेब, तुम्ही पेटविलेली बहुजन स्वाभिमानाची मशाल फुले शाहू आंबेडकरी तत्त्वज्ञानावर सामाजिक राजकीय प्रवास करणारे कार्यकर्ते विझू देणार नाही हीच तुमच्या स्मृतीला आमची कृतज्ञ मानवंदना असेल.

मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!..🙏🙏

0 Response to "सायकलच्या चाकांवर बहुजनांच्या राजकीय स्वाभिमानाचा इतिहास लिहिणारा महामानव- परमानंद मेश्राम"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article