"साप्ता.जनता की आवाजच्या" संपादकपदी महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांची नियुक्ती
- विविध अध्यात्मिक धर्म संघटना व अनेक राजकीय सामाजिक पुरोगामी संघटना कडून शुभेच्छांचा वर्षाव
- तुमसर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकाचा विस्तार तीन भाषांतून देश-विदेशात. २६ देशांपर्यंत पोहोचणार जनतेचा आवाज
भंडारा / तुमसर : येथून प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय साप्ताहिक वृत्तपत्र ‘जनता की आवाज’च्या संपादकपदी महानुभाव पंथाचे ज्येष्ठ महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांची निवड करण्यात आली आहे. वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
‘जनता की आवाज’ हे वृत्तपत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये प्रकाशित होत असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील वाचकांपर्यंत पोहोचत आहे. वृत्तपत्राने केवळ मुद्रित माध्यमापुरते मर्यादित न राहता न्यूज पोर्टल, न्यूज चॅनल, सोशल मीडिया आणि विविध नेटवर्किंग माध्यमांतून जवळपास २६ देशांमध्ये आपले जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न आणि बातम्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव हे गेल्या तीस वर्षांपासून महानुभाव पंथाच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म आणि समाजसेवेचे कार्य करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव मुळ, उरुळीकांचन येथे त्यांनी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी श्रीकृष्ण ज्ञान मंदिर तथा महानुभाव आश्रमाची स्थापना केली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
संपादकपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महंत श्री. कपाटे म्हणाले की, गरीब, शेतकरी, कामगार, महिला आणि युवक यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘जनता की आवाज’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. समाजात अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचे प्रमाण वाढत असून चमत्कारांच्या नावाखाली भीती दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारांना आळा घालणे हे आमचे प्रथम कर्तव्य असेल. ज्ञान, विज्ञान, विवेक आणि धर्म यांचा समतोल साधून समाजाला जागृत करण्याचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून केले जाईल. सत्य, निर्भीड आणि जनहिताला प्राधान्य देणारे लेखन हेच आमचे ध्येय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महंत श्री. गोपालव्यास कपाटे यांच्या निवडीची माहिती मिळताच आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महानुभाव पंथातील संत, महंत, आचार्य, अनुयायी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले.
पुणे, मुंबई, नागपूर, तुमसर, भंडारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश आणि बिहार येथूनही शुभेच्छा देण्यात आल्या. राजकीय क्षेत्रातील आमदार, खासदार आणि मंत्री यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व विविध अध्यात्मिक संघटना कडून तसेच पत्रकार बांधवांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
‘साप्ता.जनता की आवाज’चे संस्थापक/मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार व संपूर्ण वृत्तपत्र समूह यांनीही महंत श्री. गोपालव्यास कपाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Response to ""साप्ता.जनता की आवाजच्या" संपादकपदी महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांची नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें