समर्थ महाविद्यालय, लाखनीचा हीरक महोत्सवी समारोप सोहळा उत्साहात संपन्न
शनिवार, 12 जुलाई 2025
Comment
• मान्यवर माजी विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांची उपस्थिती
• महाविद्यालयाचा ६० वर्षांच्या कार्याचा गौरव
लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी या भंडारा जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्थेने ६० यशस्वी शैक्षणिक वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. या हीरक महोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ गुरुवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या समारोप सोहळ्याचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आल्हाद लाखनीकर यांनी भूषवले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी व बेरार फायनान्सचे संस्थापक मारोती जवंजार, मधुकर लाड, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हपूजे, माजी जि.प. सदस्य श्याम पाटील खेडीकर, जयकृष्ण फेंडरकर आणि प्रसिद्ध व्यापारी रमेश गभणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी केले. त्यांनी संस्थापक शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर यांच्यापासून ते आजपर्यंतच्या सर्व प्राचार्यांनी घडविलेल्या विकासयात्रेचा आढावा घेत महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची सविस्तर माहिती दिली.
मारोती जवंजार यांनी आपल्या भाषणात सांगितले, “समर्थ महाविद्यालय नसते, तर माझे शिक्षण पूर्ण झाले नसते. ही संस्था माझ्या आयुष्यातील प्रकाश आहे. मी संस्थेचा कायम ऋणी आहे आणि समाजासाठी सदैव कार्यरत राहीन.” शिवराम गिऱ्हपूजे यांनी 1971-75 च्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, “येथे आम्हाला केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर सामाजिक भानही मिळाले. गुरुजनांनी आमचं जीवन घडवलं.” मधुकर लाड यांनी महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा छात्रसैनिक आणि 1971 मधील भारतीय सैनिक म्हणून कार्य करतानाचे अनुभव सांगितले. संस्थेच्या स्थापनेचा इतिहास सांगत त्यांनी बापूसाहेब लाखनीकर यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. जयकृष्ण फेंडरकर यांनी आप्पासाहेब देशपांडे आणि दाढी सर यांचं स्मरण करून गुरुजनांच्या प्रभावाची आठवण करून दिली. श्याम पाटील खेडीकर यांनी समर्थ महाविद्यालयातून मिळालेल्या शिक्षणामुळे व्यापार, राजकारण आणि समाजसेवेत यश मिळाल्याचे नमूद केले. 1975-76 मधील आठवणी सांगताना भावना व्यक्त केल्या की, “या महाविद्यालयामुळेच मला शिक्षिकेची संधी मिळाली. केवळ २३ व्या वर्षी बापूसाहेबांनी नोकरी दिली नसती, तर मी घरी पोळ्या लाटत असते.” असे माजी विद्यार्थिनी आणि प्राचार्य शीतलताई खेडीकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. माजी सरपंच राजेश खराबे यांनी शिक्षणाचा व्यावसायिक जगतातील उपयोग विशद केला. या वेळी सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात आल्हाद लाखनीकर यांनी माजी विद्यार्थी आणि उपस्थितांचे आभार मानले आणि महाविद्यालयाची उंची सतत वाढत राहण्यासाठी माजी विद्यार्थी यांनी आपले महाविद्यालय म्हणून बघावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. रूपाली खेडीकर आणि प्रा. प्रेरणा चाचेरे यांनी अतिशय आकर्षक शैलीत केले. आभारप्रदर्शन डॉ. धनंजय गभणे यांनी केले. हीरक महोत्सवी समारोप सोहळ्यात माजी विद्यार्थी, विद्यमान विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि संस्थेच्या समर्पित योगदानाचे प्रतीक ठरले.
0 Response to "समर्थ महाविद्यालय, लाखनीचा हीरक महोत्सवी समारोप सोहळा उत्साहात संपन्न"
एक टिप्पणी भेजें