कचराकुंडीमुक्त मोहिमेची फसगत• कोणार्कच्या कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर कचरा; व्हिडिओमुळे पोलखोल
मंगलवार, 29 जुलाई 2025
Comment
सोनु क्षेत्रे
''साप्ता.जनता की आवाज"
उल्हासनगर :- पॅनल १८ मधील सेंटर पार्क हॉटेलसमोरील हटवलेली कचराकुंडी ही समस्या संपवण्यासाठी होती; पण प्रत्यक्षात तिथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमागे 'कोणार्क' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे स्थानिकांनी उघडकीस आणले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ तयार करून अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्यानंतर अखेर प्रशासनने कारवाईचे आदेश दिले आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या 'कचरा कुंडीमुक्त शहर अभियान' अंतर्गत पॅनल १८ येथील सेंटर पार्क हॉटेलसमोरील कचराकुंडी काही दिवसांपूर्वी हटवण्यात आली. कुंडी गेल्यानंतरही तिथे रोज कचरा साचत असल्याने परिसरात दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेचा त्रास सुरू आहे. याचा थेट परिणाम शेजारील नागरिकांवर; तसेच कुर्ला कॅम्प
ते स्थानकदरम्यान नागरिकांसह विद्यार्थ्यांवर होत आहे. गुरुनानक शाळा, सत्यसाई शाळा, विशाखा विद्यालय आणि मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचा रोज याच मार्गावरून जावे लागते. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते. कचऱ्यामुळे साचलेले
पाणी थेट रस्त्यावर वाहते आणि मुलांना त्या घाण पाण्यातूनच चालत शाळेत जावे लागते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.या प्रकाराबाबत चौकशी केली असता, स्वच्छता निरीक्षक नरेश परमार यांनी सुरुवातीला सांगितले की, स्थानिक नागरिकच कचरा टाकत आहेत. मात्र, स्थानिकांनी याबाबत गंभीर स्वरूपाची माहिती आणि व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला. या व्हिडिओमध्ये कोणार्क कंपनीचे कर्मचारी ट्रॉलीमध्ये कचरा आणून फेकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा व्हिडिओ समााजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत चंदनशिव यांनी उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी एकनाथ पवार आणि स्वच्छता निरीक्षक नरेश परमार यांना पाठवण्यात आला. त्यांनी याची गंभीर दखल घेतली असून, संबंधित कोणार्क कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्वच्छता अभियान म्हणजे केवळ कुंड्या उचलणे नव्हे, तर त्यामागे कायमस्वरूपी आणि जबाबदारीची रचना असली पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रशांत चंदनशिव यांनी दिली.
0 Response to "कचराकुंडीमुक्त मोहिमेची फसगत• कोणार्कच्या कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर कचरा; व्हिडिओमुळे पोलखोल"
एक टिप्पणी भेजें