धान खरेदी पुर्ण होईपर्यंत उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे
गुरुवार, 24 जुलाई 2025
Comment
• खा.डॉ.प्रशांत पडोळे यांची कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे मागणी
दिगंबर देशभ्रतार
भडांरा :- धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावरून धान खरेदी केली जाते. मात्र यावर्षी जिल्हा पणन कार्यालयाला कमी उद्दिष्ट मिळाल्याने भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत. सुरुवातीला शासनाने जे खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट संपल्यानंतर भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनाच्या वतीने उद्दिष्ट वाढवून देण्यात आले होते. मात्र आठवडाभरातच उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने पुन्हा उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. या पार्श्वभुमीवर भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पत्राद्वारे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे उद्दीष्ट वाढवून देण्याची मागणी केली.
याबद्दल बोलताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, शेतकऱ्यांचे धान शासकीय केंद्रावर विकले जाणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील संपुर्ण धान खरेदी होतील, एवढे वाढीव उद्दिष्ट मिळाले तरच सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होतील, त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. सरकार उद्दिष्ट वाढवल्याचा दावा करत आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून खरेदी होत नाही. जी होत आहे ती टप्प्याटप्प्याने होत आहे ज्यामुळे उशीर होतो. परिणामी शेतकऱ्याला अधिक वाट पाहावी लागते म्हणून शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकतो. त्यामुळे उद्दीष्ट वाढवण्याचा प्रकार केवळ कागदावर मर्यादित असतो. सरकारचे दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळे असा हा प्रकार आहे.
उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना धान विकल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पैशासाठी स्वस्तात धान विकावे लागते आणि एकूण मेहनत जेवढी होते त्याच्यातून तेवढेही अर्थार्जण होत नाही. धान विक्री केल्यानंतरही दीर्घकाळ सरकारकडून पैसे मिळत नाही. त्यामुळे सरकारकडून उशिरा पैसे मिळवण्यापेक्षा व्यापाऱ्याकडून कमी मात्र लवकर पैसे मिळवणे हा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. कारण वर्षभर खर्च झालेला असतो आणि तो खर्च भरून काढायचा असतो.बोनस देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे दिले जात नाही. मूळात शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे देखील वेळेवर मिळणे आवश्यक आहे, असेही खा.डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले.
0 Response to "धान खरेदी पुर्ण होईपर्यंत उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे "
एक टिप्पणी भेजें