"झाडे लावा, झाडे जगवा, पैसे कमवा" अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा सन्मान निधी वाटप
मंगलवार, 26 अगस्त 2025
Comment
समर्थ महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम
नरेंद्र मेश्राम
"जनता की आवाज"
लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी "झाडे लावा, झाडे जगवा व पैसे कमवा" हा अभिनव उपक्रम सत्र 2024-25 मध्ये राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना किमान एक झाड लावणे बंधनकारक करण्यात आले. लावलेल्या झाडासोबत जिओ टॅगसह आपला फोटो नोंदविण्याची अट होती. काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त झाडे लावून मोहिमेला अधिक व्यापकता दिली. या झाडांची वर्षभर निगा राखल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर विद्यार्थ्यांना सन्मान निधी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मा. घनश्यामजी पाटील खेडीकर उपस्थित होते. तर राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे जेष्ठ संचालक मा. मधुकरजी लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या अभियानात विशेष प्रातिनिधिक स्वरूपात कु. आकांक्षा नागदेवे, कु. साक्षी अतकरी, कुमारी पायल मांढरे, कु. प्रणाली वंजारी, स्नेहल तितीरमारे व सेजल कांबळे या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना असे सांगितले की, “पर्यावरण संवर्धनासाठी केलेली ही पुढाकारशील कृती आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
या अभिनव उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
0 Response to ""झाडे लावा, झाडे जगवा, पैसे कमवा" अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा सन्मान निधी वाटप"
एक टिप्पणी भेजें