नागरिकांनी समस्या मांडाव्यात – पालकमंत्री कार्यालयाचे आवाहन.
शुक्रवार, 19 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- दि. 19 : राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनीकर्म तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार येत्या रविवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृह, भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या दरबारात जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित राहणार असून नागरिकांना त्यांच्या समस्या, अडचणी किंवा निवेदने थेट पालकमंत्री महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.
तहसीलस्तरीय जनता दरबारांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. भोयर यांनी जिल्ह्यात दर सोमवारी तहसील पातळीवर जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 8 सप्टेंबर व 15 सप्टेंबर रोजी तहसील पातळीवरील जनता दरबार यशस्वीरीत्या पार पडले.
या दोन जनता दरबारांत मिळून एकूण 428 तक्रारी व निवेदने नोंदविण्यात आली. यातील 251 प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यात आली असून उर्वरित प्रकरणांचा संबंधित विभागांकडून वेगाने पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या उपक्रमाला लोकाभिमुख स्वरूप लाभले आहे.
जिल्हा प्रशासनाची तयारी
आगामी जिल्हास्तरीय जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जनता दरबाराच्या तयारीचा आढावा घेतला. विविध विभागांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांच्या समस्यांवर जलद कार्यवाही करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
नागरिकांसाठी आवाहन
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले निवेदने *लेखी स्वरूपात तयार करून* या जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कार्यालयाने केले आहे.
0 Response to "नागरिकांनी समस्या मांडाव्यात – पालकमंत्री कार्यालयाचे आवाहन."
एक टिप्पणी भेजें