शेतकऱ्यांच्या शेत शीव व पाणंन रस्त्यानां मिळणार विशिष्ट क्रमांक वाद, टळणार.
रविवार, 7 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा: - राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडी मार्ग व शेती पाणंद रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध करून कार्यपद्धती निश्चित केली आहे. आणि तसेच यामध्ये खालील रस्त्यांचा समावेश केला आहे.
कोणत्या रस्त्यांचा समावेश?
१) ग्रामीण रस्ते - एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारे.
२) हद्दीचे रस्ते - ग्रामसीमा जोडणारे.
३) ग्रामीण गाडीमागग (पोटखराब) - नकाशात १६ ते २१ फुट रुंदीने दाखवलेले.
४) पाय मार्ग (पोटखराब) - ८ ¼ फुट रुंदीने दाखवलेले.
५) शेतावर जाणारे पायमार्ग व गाडीमार्ग'- मूळ नकाशात नसले तरी वापरात असलेले.
रस्त्यांची यादी कशी तयार होणार
• तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील रस्त्यांची यादी तयार होईल.
• नकाशावर असलेले आणि नसलेले रस्ते स्वतंत्र प्रपत्रात (फॉर्म-१ व फॉर्म-२) नोंदवले जातील.
• ग्रामसभा ही यादी पाहून ठराव घेईल.
• मान्यताप्राप्त यादी तहसीलदारांकडे सुपूर्द केली जाईल.
• तहसीलदारांकडून आलेली यादी उपअधीक्षक भूअभिलेख यांच्याकडे जाईल.
• भूअभिलेख विभाग डिजिटल नकाशे वापरून रस्त्यांची लांबी, रुंदी व जागेचे अचूक सीमांकन करेल.
• सीमांकन झालेल्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचे आदेश पूर्वीप्रमाणे लागू राहतील.
• या मोजणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
• तहसीलदार प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण आढळल्यास मामलेदार न्यायालय कायदा १९०६ व महसूल कायदा १९६६ नुसार नोटीस बजावतील.
• संबंधितांची सुनावणी होईल आणि आदेशानुसार अतिक्रमण काढले जाईल.
• गरज पडल्यास पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाईल आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
• अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्याची नोंद कायमस्वरूपी अभिलेखात केली जाईल.
रस्त्यांना मिळणारा विशेष कोड
प्रत्येक रस्त्याला जिल्हा, तालुका, गाव, रस्ता क्रमांक आणि रस्त्याचा प्रकार यानुसार कोड दिला जाईल.
रस्त्यांच्या प्रकारासाठी खालील इंग्रजी अक्षरे वापरली जातील.
A = Double Line (दुहेरी रेषा)
B = Double Dotted Line (दुहेरी तुटक रेषा)
C = Single Dotted Line (एकेरी तुटक रेषा)
D = वापरात पण नकाशात नाही
E = शिव रस्ते/पाणंद रस्ते
अभिलेख व नोंदी
• प्रत्येक गावासाठी गाव नमुना क्रमांक १(फ) तयार होईल.
• त्यात गावातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची नोंद कायमस्वरूपी ठेवली जाईल.
• डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना रस्त्यांचा पूर्ण तपशील सहज मिळू शकेल.
शेतरस्त्यांसाठी विशेष समित्या
शासन निर्णयानुसार, शेतरस्त्यांशी संबंधित सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी एक समिती जिल्हास्तरावर तर दुसरी तालुकास्तरावर काम करणार आहे.
जिल्हास्तरीय समिती
√ समिती अध्यक्ष :– जिल्ह्याचा जिल्हाधिकारी
√ समिती सदस्य :– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
√ जिल्हा पोलीस अधीक्षक
√ भूअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक
√ उपजिल्हाधिकारी (महसूल)
√ जबाबदारी :– जिल्ह्यातील सर्व शेतरस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करण्याची जबाबदारी या समितीवर असेल.
तालुकास्तरीय समिती.
√ समिती अध्यक्ष :– उपविभागीय अधिकारी
√ समिती सदस्य :– गटविकास अधिकारी.
√ तालुका निरीक्षक भूअभिलेख
√ पोलिस निरीक्षक
√ पोलिस उपनिरीक्षक
√ तहसीलदार
√ जबाबदारी :– तालुक्यातील प्रत्येक गावाकडून शेतरस्त्यांबाबतचे प्रस्ताव मागविणे, त्यांच्या आधारे सीमांकन करणे आणि आवश्यक असल्यास अतिक्रमणाविषयी बैठका घेऊन शेतकऱ्यांना जागरूक करणे अशी जबाबदारी या समितीवर आहे.
0 Response to "शेतकऱ्यांच्या शेत शीव व पाणंन रस्त्यानां मिळणार विशिष्ट क्रमांक वाद, टळणार."
एक टिप्पणी भेजें