-->
कामेच पुर्ण झाली नाहीत;'हर घर नल' कधी येणार?

कामेच पुर्ण झाली नाहीत;'हर घर नल' कधी येणार?


• लाखनी तालुक्यातील जलजीवन मिशनची कित्येक कामे अर्धवट अवस्थेत.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखनी :- तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात आले.घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठीची ही योजना अनेक गावांमध्ये अर्धवट अवस्थेत आहे.यामध्ये तालुक्यातील कित्येक गावांचा समावेश आहे. अनेक गावातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात.योजनाच पूर्ण झालेली नसल्याने याही वर्षी लोकांची भटकंती कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.

लाखनी तालुक्यात जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत ८२ कामे मंजूर झाली आहेत.यातील ५५ कामे पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.निधी ऊपलब्ध नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.पालांदूरसह परिसरातील काही गावांचीही अशीच परिस्थिती आहे.निधी प्राप्त होऊन कामे कधी होणार?असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

बॉक्स१.
पावसाळ्यात दूषित पाणी पुरवठ्याची शक्यता

पावसाळ्याच्या दिवसात काही गावातील नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.थेट नदी,विहिरीतील पाण्याचा उपसा करून केवळ ब्लिचिंग पावडर टाकून नळाला सोडले जात असल्याची माहिती आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या योजना पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.यात सातत्य असणे आवश्यक झाले आहे.

बॉक्स२.
टंचाईग्रस्त गावातील योजनाही लांबल्या

लाखनी तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील काही गावांतील नागरिकांना प्रत्येक उन्हाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागते.अशाही काही गावात जल जीवन मिशन ही योजना हाती घेण्यात आली;परंतु या कामांना गती मिळालेली नाही.त्यामुळे उन्हाळा आला की,नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते.

बॉक्स३.
तात्पुरत्या उपाययोजना

तात्पुरत्या उपाययोजना करून उन्हाळ्यात थोडा दिलासा दिला जातो.पुढे 'जैसे थे' स्थिती होते. काही गावांमध्ये योजना जरी पूर्णत्वाच्या मार्गावर असल्या तरी जलस्त्रोताच्या उभारणीसाठी जागेचाही प्रश्न कायम आहे.अशा ठिकाणी योजनेच्या कामाला सुरुवातही झालेली नाही.या समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.भर उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागतानाचे चित्र काही ठिकाणी आहे.

बॉक्स४.
निधीचा तुटवडा

लाखनी तालुक्यातील ८२ गावांत जलजीवन मिशनच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.यासाठी निधीही मिळाला;परंतु प्राप्त निधीतून कामे होऊ शकली नाहीत.परिणामी अनेक भागातील कामे रखडली आहेत. टाकी,पाइपलाइन,विहिरी अशा प्रकारची कामे थांबलेली आहेत. काही ठिकाणी कामांना केवळ सुरुवात झालेली आहे.अनेक ठिकाणी पाइपलाइनचीही कामे झालेली नसल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया
१.) "लाखनी तालुक्यात ८२ ठिकाणी जल जीवन मिशन योजना राबविली गेली.बहुतेक ठिकाणी कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून ५५ ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत.बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला आहे."

नीलम हलमारे
उपकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग भंडारा

२.) "अनेक गावांतील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला आणि पावसाळ्यात अशुद्ध पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.त्यामुळे जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या योजना पूर्णत्वास जाण्याकरिता शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे."

संजय खंडाईत,
लाखनी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)

0 Response to "कामेच पुर्ण झाली नाहीत;'हर घर नल' कधी येणार?"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article