डव्वा गावात राजकारणाचा थरार — सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या अविश्वास.
बुधवार, 15 अक्टूबर 2025
Comment
• ठरावावरून अक्षरशः रणांगण, पोलिसांचा लाठीचार्ज, ग्रामस्थ आक्रोशात
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक जनता की आवाज"
गोंदिया :- जिल्ह्यातील सडक अजुनी तालुक्यातील हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. पण आज हेच गाव लोकशाहीचा सन्मान करायचा की राजकारणाचा तमाशा बघायचा अशा प्रश्नांनी पेटून उठले आहे. ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्ष इतका वाढला की वातावरण अक्षरशः रणांगण बनलं.
महिला सरपंच यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरून आज गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. तहसीलदार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या सभागृहात चर्चा सुरू होती. सुरुवातीला शब्दांच्या बाणांनी रंगलेली सभा काही क्षणातच धक्काबुक्की, हातापायी आणि आरडाओरडीत परिवर्तित झाली.
गावकऱ्यांनी अविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर अक्षरशः धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. या झटापटीत काही पोलीस आणि नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक तसेच नवेगाव बंधारे येथील अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक पहारा आहे.
सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्यावर अविश्वास का?
गावात ‘माझी वसुंधरा’ अभियानातून तब्बल एक कोटी रुपयांचा निधी आला होता. सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी हा पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र काही सदस्यांनी या निधीतून त्यांचाही ‘हिस्सा’ मिळावा अशी मागणी केली होती. सरपंचांनी ती मागणी नाकारल्याने असंतोष निर्माण झाला.
याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला. मात्र गावकऱ्यांचा सरपंच चौधरी यांना मोठा पाठिंबा असल्याचं आज स्पष्ट दिसलं. अनेक ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, घोषणाबाजी केली आणि सरपंचांच्या बाजूने एकवटले.
आमच्या गावाची खरी सरपंच फक्त योगेश्वरी ताई!”
“आमच्या सरपंच मॅडमनी गावाचं रूप पालटलंय. पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण या सर्व क्षेत्रात काम केलंय. तीला देशपातळीवरील पुरस्कारही मिळाले आहेत. हीच आमची खरी नेती. काही स्वार्थी लोकांना विकास डोळ्यात खुपतोय, म्हणून हा ठराव आणला.”
महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गावाने अनेक योजना राबवून राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त केला आहे. एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळवून त्यांनी गावाचा विकास घडवला असून लवकरच आणखी तीन कोटींचा निधी मिळणार असल्याचंही ग्रामस्थ सांगतात.
पोलिसांची सतर्कता आणि प्रशासन हादरलं
सभागृहातील तणाव आणि नंतरच्या झटापटीमुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रशासन हादरलं असून पुढील काही दिवस गावात कडक नजर ठेवली जाणार आहे.
0 Response to "डव्वा गावात राजकारणाचा थरार — सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या अविश्वास."
एक टिप्पणी भेजें