समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे 150 वी भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा
सोमवार, 17 नवंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘जनजाती गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख व मराठी विभाग प्रमुख डॉ. बंडू चौधरी तसेच ग्रंथालय संचालक डॉ. धनंजय गभने मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमामध्ये बोलताना प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जिद्दीने लढणारा हा योद्धा हा केवळ आदिवासी समुदायाचाच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचा प्रेरणास्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय आयुष्याने समाजात समानता, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना रोवली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. बंडू चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी समाजाची सांस्कृतिक परंपरा, जीवनमूल्ये आणि त्यांच्या संघर्षाचा आढावा घेतला. तर डॉ. धनंजय गभने यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा ग्रंथसंपदेतून घेतलेला अभ्यास आणि त्यांचे ऐतिहासिक योगदान यावर भाष्य केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
0 Response to "समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे 150 वी भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा"
एक टिप्पणी भेजें