मरहेगाव ते जैतपूर राज्यमार्गावरील दोन ठिकाणी रस्ता कच्चाचं!
शुक्रवार, 28 नवंबर 2025
Comment
• राज्यमार्गाला गालबोट, शेतकऱ्यासह प्रवाशांना असह्य अडचण
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- मरहेगाव ते जैतपूर या राज्यमार्गावर दोन ठिकाणी कच्चा रस्ता आहे. हा मार्ग तयार करताना अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी बांधकाम होऊ न शकल्याने पावसाळ्याच्या दिवसात रहदारीला मोठा फटका बसला. या राज्यमार्गावर मोठी रहदारी सुरू आहे. चुलबंद नदीच्या पुढे जैतपुर च्या दिशेने १२०० तर मरहेगाव गावाच्या पुढे ६५० मिटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. त्यामुळे रहदारी प्रभावित ठरली आहे.
पालांदूर ते जैतपूर/ बारव्हा असा हा ३६१ क्रमांकाचा राज्यमार्ग दोन तालुक्यांना जोडणारा ठरला. पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्याकरिता राज्यमार्ग सोयीचा ठरला आहे. आमदार नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी करोडो रुपयांचा निधी या मार्गासाठी मंजूर केला. ग्रामीण रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा देऊन पालांदूर, मरहेगाव , जैतपूर व बारव्हा या गावांना विकासाची नवी संधी मिळाली. शनिवारी पालांदूर येथील आठवडी बाजारात चंद्रपूर ,गोंदिया व त्याही पुढून आंध्रप्रदेशातून पशुपालक रात्रभर प्रवास करीत आहेत. पालांदुरात पशुपक्षांचा मोठा बाजार सुरू झाला आहे. परंतु दोन ठिकाणी फुटलेल्या रस्त्यामुळे रहदारीला समस्या येत असल्याने व्यापारी वर्गांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे.
मऱ्हेगाव गावापर्यंत पालांदूर पासून सुसाट डांबरीकरण झाले आहे. परंतु शामराव बेंदवार यांच्या राहत्याघरापासून तर पुढे चुलबंद नदी पुलाच्या पोच मार्गापर्यंत रस्ता जागोजागी फुटला असून मोठे मोठे दगड रस्त्यात आहेत. त्यामुळे मऱ्हेगाव वासियांना दैनंदिन रहदारी करीता सुद्धा मोठी अडचण तयार झाली आहे.
उपविभागीय बांधकाम विभाग साकोली यांना सदर रस्त्याच्या अनुषंगाने निवेदने देण्यात आली आहेत. मात्र संबंधित अधिकारी वर्ग निधीची तरतूद न झाल्याने रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याचे नेहमीच सांगत आहेत. शासनाने सदर रस्त्याची समस्या ओळखून निधीची तरतूद करून द्यावी.
सरपंच शामराव बेंद्वार मऱ्हेगाव
सदर दोन ठिकाणी रस्त्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर मागणी केली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात सुद्धा बजेटला घालण्यात येईल.
अभियंता
कृष्णा लुटे
सार्वजनिक बांधकाम विभाग साकोली
फोटो:
0 Response to "मरहेगाव ते जैतपूर राज्यमार्गावरील दोन ठिकाणी रस्ता कच्चाचं! "
एक टिप्पणी भेजें