तुमसर नगरपरिषदेतील उमेदवारीच्या घडामोडीजात, धर्म आणि पारंपरिक सत्ता समीकरणांचा प्रभाव स्पष्ट.
रविवार, 16 नवंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
विषेश प्रतिनिधी
तुमसर :- स्थानिक राजकारणात सुरू असलेल्या हालचालींमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सर्वच पक्षांनी उमेदवारी ठरवताना जातीय गणित, धार्मिक मतदारवर्ग आणि पारंपरिक सत्तासंरचना यांना अधिक प्राधान्य दिले आहे. आज झालेल्या चर्चांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भाजपातील घडामोडी हेच वास्तव पुन्हा अधोरेखित करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून दिवसभर तणाव निर्माण झाला. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत निर्णय अपेक्षित होता, मात्र अंतर्गत वाटाघाटींचा तोडगा न निघाल्याने उमेदवारी थांबवण्यात आली. यासीन छवारे, योगेश सिंगनजुळे, सागर गभने आणि अभिषेक कारेमोरे ही नावे चर्चेत होती, पण अंतिम निर्णय घेताना जातीय वजन, समाजातील परंपरागत प्रभाव आणि स्थानिक राजकीय वारसा यांची मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. या समीकरणांतूनच अखेर अभिषेक कारेमोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
या निर्णयानंतर अस्वस्थ कार्यकर्त्यांमध्ये बंडाचे संकेत दिसले. सागर गभने यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी दर्शवली असून यासीन छवारे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. कार्यकर्त्यांच्या नाराजीचे मूळही तेच आहे, की पक्षाने उमेदवार निवडताना वैयक्तिक गुणवत्ता, कामगिरी किंवा शिक्षणापेक्षा पारंपरिक जातीय-धार्मिक घडीला महत्त्व दिले.
दरम्यान भाजपाकडेही परिस्थिती काही वेगळी नाही. येथील अंतर्गत निवडींमध्येही जातीय मांडणी आणि परंपरागत मतदारांचा कल बघितला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. अखेरीस प्रदीप पडोळे यांच्या नावावर भाजपा उमेदवारी निश्चित झाली. कार्यकर्त्यांच्या मोठ्या समूहासह त्यांनी अर्ज दाखल केला असून ते निवडणुकीस सज्ज झाले आहेत.
दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीची प्रक्रिया संपताना पारदर्शकता, कार्यक्षमता किंवा नवीन नेतृत्वाला संधी देणे यापेक्षा जातीय मतदारवर्गाचे गणित, धार्मिक पातळ्यांवरील प्रभाव आणि जुनी राजकीय पद्धत यांना जास्त महत्त्व देण्यात आले हे निदर्शनास आले आहे.
येणाऱ्या निवडणुकीत हा पारंपरिक आणि जातीय राजकारणाचा प्रभाव किती खोलवर जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुमसर नगरपरिषदेची लढत त्यामुळे अधिक गुंतागुंतीची आणि चुरशीची होणार हे निश्चित आहे.
0 Response to "तुमसर नगरपरिषदेतील उमेदवारीच्या घडामोडीजात, धर्म आणि पारंपरिक सत्ता समीकरणांचा प्रभाव स्पष्ट."
एक टिप्पणी भेजें