भंडारा अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय पाथरीच्या उप सरपंच, महिला सदस्याच्या विरूद्धची अपात्रतेची अपील फेटाळली.
रविवार, 30 नवंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील मौजा पाथरी पुनर्वसन येथील ग्राम पंचायत उप सरपंच व एका महिला सदस्याच्या विरूद्ध भंडाऱ्याच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेली अपात्रतेची अपील अप्पर जिल्हाधिकारी श्री.राजेंद्रकुमार जाधव यांनी फेटाळली.
मौजा पाथरी हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव असून सन १९५० पासून आलेल्या पुरामुळे या गावाचे पुनर्वसन मौजा चिचाळ व मौजा पाथरी येथील जागा अधिग्रहित करून नागरिकांना भुखंडाचे वाटप करण्यात आले.त्यानुसार नागरिकांनी आपले राहाते घर तयार केले आहेत.
या मौजा पाथरी पुनर्वसन च्या ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक सन २०२३ ला घेण्यात आली होती. या निवडणुकीत विजयी झालेले सदस्य नामे हरिहर श्रीकृष्ण नागपुरे यांची उप सरपंच पदी निवड करण्यात आली.परंतू त्यांनी व दुसऱ्या महिला सदस्य नामे सुनिता उमाजी देशमुख यांनी शासकिय जागेवर अतिक्रमण केले आहे, असे आरोप करून दुसरे सदस्य नंदलाल तुकाराम भुरे यांनी उपरोक्त उपसरपंच व सदस्य महिलेविरूद्ध अपात्रतेची कार्यवाही करावी व त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांच्या न्यायालयात ग्राम पंचायत अधिनियमाच्या कलम १४-१(जे-३) अन्वये अपील दाखल केली होती.
सदर प्रकरणात उपसरपंच व महिला सदस्य यांनी आपले वकील ॲड. महेंद्र गोस्वामी यांच्या मार्फत सविस्तर लेखी उत्तरा सह त्यांच्या मालकीचे पुरावे व त्यांना मिळालेले भुखंडाचे पट्टे सादर केले व त्यांनी शासनाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचे सिद्ध केले.याउलट अपीलार्थी हे उपसरपंच व महिला सदस्याचे अतिक्रमण सिद्ध करू शकले नाही व कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही.
त्यामुळे या प्रकरणी दोन्ही पक्षांकडील लेखी व तोंडी युक्तिवाद व दाखल कागदपत्रांच्या आधारे अप्पर जिल्हाधिकारी श्री.राजेंद्रकुमार जाधव यांनी मौजा पाथरी (पुनर्वसन) ग्रामपंचायत चे उपसरपंच नामे हरिहर श्रीकृष्ण नागपुरे व सदस्य सुनिता उमाजी देशमुख यांच्या विरूद्ध दाखल करण्यात आलेली अपात्रतेची व सदस्यत्व रद्द करण्याची अपील फेटाळून लावली.
या प्रकरणी उपसरपंच व महिला सदस्याच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी सक्षमपणे बाजू मांडली व युक्तिवाद केला. या निर्णयामुळे ग्राम पंचायत मध्ये बहुमत कायम राहिले असून गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
0 Response to "भंडारा अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय पाथरीच्या उप सरपंच, महिला सदस्याच्या विरूद्धची अपात्रतेची अपील फेटाळली."
एक टिप्पणी भेजें