-->
बारूदगोळा व रानडुकराच्या मांसासह चार शिकाऱ्यांना अटक किटाडी येथील घटना.

बारूदगोळा व रानडुकराच्या मांसासह चार शिकाऱ्यांना अटक किटाडी येथील घटना.

.                  बारुद गोळा सहीत आरोपी

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालय व क्षेत्र सहाय्यक कार्यालय किटाडी अधिनस्त लाखनी तालुक्यातील किटाडी जंगलबिटात बारूदगोळ्याच्या सहाय्याने
रानडुक्कराची शिकार करून त्यांचे मांस विक्रीसाठी नेण्याची तयारी करीत असताना रानडुकराच्या ७० किलो मांसासह चार शिकाऱ्यांना वन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली.ही कारवाई मंगळवारी(९डिसेंबर )सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

धर्मेंद्रसिंग गोविंदासी टाक (५२वर्ष), जालिंदरसिंग नेपालसिंग टाक (४०वर्ष), बलदेवसिंग धर्मेंद्रसिंग टाक (२३वर्ष), लक्ष सतीश अहिरवार (१६ वर्ष), सर्व रा.अर्जुनी (मोरगाव), जि. गोंदिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

 किटाडी जंगल बीटात मंगळवारी वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मांसभक्षी जनावरांचे पदचिन्ह सर्वेक्षणाचे काम करीत असताना चार संशयित इसम आढळून आले.त्यांची कसून चौकशी केली असता बारूदगोळ्याच्या साहाय्याने रानडुकरांची शिकार केल्याचे सांगितले. त्यांच्याजवळून ७० किलो रानडुकराच्या मांसासह शिकारीसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड,दोन मोटरसायकल, एक काता, दोन सुरी जप्त केल्या. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.ही कारवाई लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर शिंपले,वनरक्षक गोपीचंद डोये,बीटरक्षक अमित वाघाये,वनपाल राहुल लोणारे,नागेश सिंगारपुतळे,चंद्रकांत मोरे, राजेश माटे यांच्यासह वन मजुरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

रकाना १.
या परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारी नित्याच्याच
रोखणार कोण?.

किटाडी गावालगतचा बराचसा परिसर हा जंगलव्याप्त असून त्यात अनेक जंगली श्‍वापदे आढळतात.परंतु,अलीकडे काही भागामध्ये रानडुकरांसह छोट्या प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे.याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.असे या घटनेवरून दिसून येते त्यामुळे वन्य प्राण्यांच्या शिकारी रोखणार कोण ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.या परिसराच्या विविध भागामध्ये अनेक वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.येथील जंगलांमध्ये पट्टेदार वाघासह बिबट्या,गवा,तरस,लांडगे, रानडुक्कर,भेकर,ससे,सांळीदर असे अनेक वन्यजीव तसेच प्राणी आढळून येतात. वनविभागामार्फत व्याघ्र गणना राबवून बिबटे व अन्य हिंस्र प्राण्यांचे प्रमाण किती वाढले याची माहिती काढण्यात येते. मात्र,या प्राणी गणनेत बिबट्या सारख्या प्राण्याची नेमकी संख्या कितीने वाढली याची योग्य माहिती मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.असे वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून खाजगीत सांगण्यात येते.त्यामुळे एका विशिष्ट कालावधीत किती प्राण्यांची शिकार झाली याची नेमकी माहिती वन विभागाकडे उपलब्ध होत नाही.त्यातच जिल्ह्यातील वन्य प्राण्याच्या शिकारी रोखण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.ज्याप्रमाणे शिकारींमुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत.त्याचप्रमाणे जंगलातील वाढत्या वणव्यांमुळेही प्राणी होरपळून मरत आहेत.वणवे आटोक्यात आणता येत नसल्याने वन्य प्राण्यांचे हकनाक जीव जात आहेत.वन संपदा जितकी महत्वाची आहे तितकेच वन्य प्राणीही महत्वाचे आहेत.असे असूनही वन विभागाकडून अनेकवेळा कारवाई होण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते.अनेकदा वन विभागाचे अधिकारी शिकार केल्याप्रकरणी शिकाऱ्यांना पकडतात.मात्र, शिकार होऊच नये यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.ग्रामीण भागात अनेक वेळा रान डुकरांची शिकार करून त्याच्या मांसाची विक्री राजरोसपणे केली जाते याची माहिती वन विभागाला नसावी हे न समजण्यापलीकडचे कोडे आहे.काही लोकप्रतिनिधींचा शिकार करणाऱ्या लोकांवर वरदहस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिकाऱ्यांवर कारवाई करणे अनेकवेळा प्रशासकीय यंत्रणेकडून टाळले जाते.अशी चर्चा अधून मधून नागरिकांमध्ये रंगत असते.गावाच्या लगतच्या भागातच शिकारी होत असताना अधिकारी नेमके काय करतात? तसेच मुद्दामहुन शिकार्‍यांकडे दुर्लक्ष केले जात आहे काय? असा प्रश्‍नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रकाना २.
कायद्याची कडक अंमलबजावणी हवी !.

वन्य प्राण्यांसाठी जंगलात मोठ्या प्रमाणात फासे लावण्याचे प्रकार घडतात.वनविभागाकडून वन्यप्राण्याची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्‍या अधून मधून आवळल्या जातात.मात्र,फासे लावणारे सराईत गुलदस्त्यातच राहतात. जंगलात वन्यप्राण्याचा फासात जीव गेल्यास फासे कोणी लावले? याचा शोध वनविभागाकडून घेण्यात येत नाही.
जंगलात फासे लावणे तसेच शिकार करणे हा वन्यजीव अधिनियम १९७२ कलम ९ नुसार गुन्हा आहे.यासाठी ३ ते ७ वर्षाची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड अशी तरतुद आहे. त्यामुळे फासे लावणाऱ्याचा शोध घेवून कारवाई झाल्यास वन्यप्राण्यांचा धोका कमी होऊ शकतो.मात्र,त्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना हवी !.

वनविभागाकडून अधून मधून वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात येते. त्यांना पोलिसांची साथही मिळत असते.मात्र,वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. नागरिकांकडून निवडणुकीपूरती शस्त्र जमा करून न घेता बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी.असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे

0 Response to "बारूदगोळा व रानडुकराच्या मांसासह चार शिकाऱ्यांना अटक किटाडी येथील घटना. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article