लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश.
मंगलवार, 30 दिसंबर 2025
Comment
• लाखनी येथील प्रकार.
• दंडार कला महोत्सवाच्या रूपात जलशाचे भव्य आयोजन.
लाखनी :- ग्रामीण लोककलेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी लाखनी नगरात दरवर्षी जलशाचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार यंदाही 26 डिसेंबर रोजी लाखनी येथे जलशाचे भव्य आयोजन करण्यात आले. राजेश उर्फ बबलू निंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलसा आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दंडार कला महोत्सवात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विविध दंडार मंडळांच्या कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या जलशाच्या माध्यमातून केवळ ग्रामीण लोककलेचे मनोरंजनात्मक सादरीकरणच झाले नाही, तर सामाजिक जनजागृतीशी संबंधित महत्त्वपूर्ण संदेशही कलाकारांनी प्रभावीपणे मांडले, त्यामुळे कार्यक्रमाला विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सेवक वाघाये, माजी जिल्हा परिषद सदस्य शफी लद्धानी, नगर पंचायत अध्यक्षा त्रिवेणी पोहरकर, शिवराम गिरेपुंजे, महादेव गायधनी, मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी, सावरीचे सरपंच सचिन बागडे तसेच नगर पंचायतचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. सप्तश्रुंगी दंडार मंडळ, सासरा यांना प्रथम पुरस्कार म्हणून ₹20,000 नगर पंचायत लाखनीच्या सदस्यांच्या वतीने देण्यात आले, तर शारदा बहुउद्देशीय महिला दंडार मंडळ, निहारवानी यांना द्वितीय पुरस्कार म्हणून ₹15,000 प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर दंडार मंडळांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. जलशाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश निंबेकर, इशांत सपाटे, संदीप भंडारकर, अशोक हजारे, सचिन भैसारे, प्रवीण आकरे, प्रदीप तितिरमारे, शरद निर्वान, सत्यवान वंजारी, प्रमोद फाये आदींनी अथक परिश्रम घेतले. या भव्य जलशाने ग्रामीण लोककलेला नवे व्यासपीठ मिळवून दिले असून, नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचे प्रेरणादायी कार्य केले आहे.
0 Response to "लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश."
एक टिप्पणी भेजें