लाखनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार ?
रविवार, 14 दिसंबर 2025
Comment
• रुग्णालयात मूलभूत सुविधा व संसाधनांचा अभाव
• अपर्याप्त मनुष्यबळ.
नरेंद्र मेश्राम "
साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- आरोग्य सेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाने आरोग्य विषयक धोरण आखले आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे तसेच शासनाच्या दुजाभावाने अजूनही शेवटचा घटक आरोग्य सेवा मिळण्यापासून वंचित आहे. असाच प्रकार लाखनी ग्रामीण रुग्णालयात अनुभवास मिळत आहे. लाखनी हे राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याचे शहर असून तालुक्यातील नागरिक उपचारासाठी येथे येत असतात. गरीब व गरजू नागरिक प्राधान्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात. तर राष्ट्रीय महामार्ग लाखनी शहराला दोन भागात विभागून गेल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे आहे नेहमीच किरकोळ व मोठे अपघात होत असतात. याशिवाय शाळेत आयोजित रोगनिदान व इतर शिबिर आदी कामे येथील कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. मात्र त्यामानाने सुविधा देण्यास अपुऱ्या मनुष्यबळामुळे येथील ग्रामीण रुग्णालय सक्षम नसल्याने या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
लाखनी शहराला तालुक्याचा दर्जा मिळाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण करण्यात आले तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा(वाघ) येथे स्थलांतरित करण्यात आले. येथे ३० खाटांची मंजुरी आहे. मात्र प्रत्यक्षात २० च खाटा उपचारासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. अधीपरीचारिका केवळ ७ च आहेत. येथील कामकाजाच्या मानाने ही पदे अपुरी आहेत. शहरात अपघात आणि इतर घटना नित्यनेमाने होत असतात. त्यामुळे त्यांनाही उपचाराची गरज असते. स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांच्यावरही उपचार येथे केले जाते सर्व बाबी करत असताना वैद्यकीय अधिकारी व अधीपरीचारिका यांना कामाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण करणे गरजेचे झाले आहे.
शासनाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील ३ रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केले असून तुमसर उपजिल्हा रुग्णालयाला सामान्य रुग्णालयात, मोहाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात तर वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन केले. मात्र लाखनी ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज लक्षात घेता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालय करणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींची उदासीनता व शासनाचे दुर्लक्षित धोरण यामुळे या रुग्णालयाकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही. रुग्णालयात दररोज ३५० ते ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येत असतात तर आंतररुग्ण विभागात दररोज १५-१६ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. रुग्णालयात ७ अधिपरिचारिका असून २ वार्ड आहेत. रुग्णांच्या मांनाने येथे अपुऱ्या सोयी असल्यामुळे मूलभूत सुविधांचा अभाव दिसतो. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होणे आवश्यक आहे.
पीएचसी च्या श्रेणीवर्धनाची गरज(चौकट)
चुलबंद नदी खोऱ्यात वसलेला मुरमाडी/तुप परिसर दुर्गम भाग म्हणून परिचित असून इथून पालांदुर १५ किमी तर लाखनी २० किमी अंतरावर आहे. जाण्या येण्याची सुविधा नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नाहीत त्यामुळे मुरमाडी/तूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे आवश्यक झाले आहे.
0 Response to "लाखनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार ? "
एक टिप्पणी भेजें