-->
विशेष लेख....26 जानेवारी!..

विशेष लेख....26 जानेवारी!..


     संकलन.                   संग्रहक  
संजीव भाबोंरे        हर्षवर्धन देशभ्रतार 

७६ वर्षांनंतरही प्रश्न तसाच — खरंच भारतात प्रजेचं राज्य आहे का?

ध्वज उंच फडकतो,
गाणी स्वातंत्र्याची गातो,
मतदानानंतर मात्र प्रजेलाच विसरतो.
संविधान हातात,
सत्ता मोजक्यांची झाली,
सांगाच हो देशा — प्रजासत्ताक कुठे हरवली?
                           प्रा.राहुल डोंगरे

२६ जानेवारी उजाडतो.
रस्त्यांवर तिरंगा, व्यासपीठांवर भाषणं आणि आश्वासनांचा वर्षाव होतो.
मात्र सण संपतो…
आणि सामान्य माणसाचं आयुष्य मात्र तसंच कठीण, तसंच असुरक्षित राहतं.

संविधान स्पष्ट सांगतं —
“सर्व सत्ता जनतेत निहित आहे.”
पण वास्तवात सत्ता फाईलमध्ये अडकते,
आणि प्रजेचा आवाज कार्यालयाच्या दारातच गुदमरतो.

मतदान केलं… जबाबदारी संपली का?

पाच वर्षांतून एकदा बोटाला शाई लावली,
की लोकशाही पूर्ण होते का?
निवडून दिलेले लोकप्रतिनिधी निवडणूक संपताच
प्रजेपासून इतके दूर का जातात?

शाळा बंद पडतात,
रुग्णालयात औषध नाही,
शेतकरी कर्जात बुडतो,
तरुण रोजगारासाठी भटकतो,
आणि प्रश्न विचारला की उत्तर मिळतं —
“नियम असेच आहेत!”

प्रजा फक्त सहनशील आहे का?

कर प्रजा भरते,
महागाई प्रजा झेलते,
नियम प्रजेवरच लादले जातात,
मग सवलती मात्र मोजक्यांसाठीच का?

गरीबासाठी कार्यालय म्हणजे अपमान,
आणि सत्ताधाऱ्यांसाठी तेच कार्यालय
सन्मानाचं व्यासपीठ कसं बनतं?

संविधान पुस्तकात… अन्याय रस्त्यावर?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गजर होतो,
पण आवाज उठवला की दबाव वाढतो.
प्रश्न विचारणारा संशयास्पद ठरतो,
आणि चुकी करणारा सत्तेच्या छायेत सुरक्षित राहतो.

हेच का आपण साजरा करत असलेलं प्रजासत्ताक?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रजासत्ताकाचे खरे शिल्पकार

आज हा प्रश्न विचारण्याचं धैर्य आपल्यात असेल,
तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे आहे.

शतकानुशतके गुलामगिरी, अन्याय आणि बहिष्कार सहन केलेल्या समाजाला
बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून उभं केलं.

मतदानाचा हक्क दिला,

समानतेचा अधिकार दिला,

अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं,

आणि सर्वात महत्त्वाचं — प्रश्न विचारण्याचं नैतिक बळ दिलं.

बाबासाहेबांना फक्त जयंती-पुण्यतिथीपुरतं मर्यादित करणं
हेच त्यांच्या विचारांवरचं मोठं अन्यायकारक मौन आहे.

संविधान हा केवळ ग्रंथ नाही,
तो शोषितांचा ढाल, वंचितांचा आवाज आणि प्रजेचं शस्त्र आहे.

खऱ्या प्रजासत्ताकाची ओळख

प्रजासत्ताक म्हणजे फक्त ध्वजारोहण नव्हे,
तर सत्तेला प्रश्न विचारण्याचं धैर्य.
लोकशाही टिकते ती शांततेने नव्हे,
तर जागरूक, निर्भीड आणि संविधाननिष्ठ प्रजेमुळे.

आज देशाला अजून एका भाषणाची गरज नाही,
तर जाग्या प्रजेची गरज आहे.

मला असं वाटतं की —
प्रजा जागी झाली, तर सिंहासन हादरेल.
प्रश्नांच्या वादळात खोटं टिकणार नाही.
तोच खरा प्रजासत्ताक दिन मानू या,
ज्या दिवशी सत्तेपेक्षा प्रजेला किंमत राहील!

✍️ … राहूल डोंगरे
शिवाजीनगर, तुमसर
ता. तुमसर, जि. भंडारा (म.रा.)
मो. ९४२३४१३८२६

0 Response to "विशेष लेख....26 जानेवारी!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article