-->
गणतंत्र दिवस : देशप्रेम की संविधानप्रेम?..

गणतंत्र दिवस : देशप्रेम की संविधानप्रेम?..


          संकलन/संग्रहक 
        हर्षवर्धन देशभ्रतार 

आज 26 जानेवारी—गणतंत्र दिवस. तिरंगा फडकतो, राष्ट्रगीत घुमते, देशप्रेमाच्या घोषणा दिल्या जातात. मात्र या सर्व औपचारिकतेआड एक अस्वस्थ करणारा प्रश्न दडलेला आहे. 'भारत खरोखर संविधानाने चालतो आहे की केवळ बहुमताच्या दडपशाहीने?'
गणतंत्र दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नाही. तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. लोकशाही आपण किती जपली, आणि संविधान आपण किती पायदळी तुडवले— याचा हिशोब मांडण्याचा दिवस आहे.
                लेखक - डॉ.प्रा.देवानंद बि.नंदागवळी 

26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्पष्ट भूमिका घेतली होती- हा देश कुणा राजाचा नाही, कुणा धर्माचा नाही, कुणा जातीचा नाही; हा देश संविधानाचा आहे.
स्वातंत्र्य मिळवणे अवघड होते, पण त्या स्वातंत्र्याला लोकशाहीचा अर्थ देणे याहूनही अधिक कठीण काम होते. तो अर्थ दिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्यांची पुस्तिका नाही; तो सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज आहे. या संविधानाने फक्त मतदानाचा अधिकार दिला नाही, तर समान मतदानाचा अधिकार दिला. गरीब असो की श्रीमंत, स्त्री असो की पुरुष, शिक्षित असो की अशिक्षित, वयाने लहान असो की मोठा— कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. कोणालाही विशेष सवलत नाही, कोणालाही जन्मतः श्रेष्ठत्व नाही.
मात्र आज चित्र वेगळे दिसते.
आज या देशात संविधानाचे प्रकार करणारे मोठ्या संख्येने आढळतात. संविधानाच्या नावाने मत मागितली जातात, आणि सत्तेत गेल्यावर त्याच संविधानाची तोडफोड केली जाते. संविधानावर चालूनच संविधानालाच नाकारणे— हा लोकशाहीतील सर्वात मोठा दांभिकपणा आहे.

ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणताही हातभार लावलेला नाही, ज्यांच्या पूर्वजांनीही बलिदान दिलेले नाही, ते आज देशभक्तीचे ठेकेदार बनले आहेत. इतिहास नाकारला जातो, संविधान नाकारले जाते, आणि तरीही देशप्रेमाचा गजर केला जातो. 
अनेक धर्म, जाती, पंथसंविधानामुळे सुरक्षित आहेत, पण त्याच संविधानाचा उघड तिरस्कार करतात. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या विचारसरणीची वंशज आजही समाजात सक्रिय आहेत— फक्त पद्धती बदलल्या आहेत.
सर्वात धोकादायक बाब म्हणजे— लोकांना अधिकारांची पूर्ण जाणीव आहे, पण कर्तव्यांची चीड आहे. अधिकार मागताना संविधान आठवते, पण कर्तव्य निभावायची वेळ आली की तेच संविधान विसरले जाते.
हे असेच चालू राहिले, तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल. लोकशाही कमकुवत झाली, तर अराजकता वाढेल. आणि अराजकतेतून हुकूमशाहीचा जन्म होतो— जिथे प्रश्न विचारणे गुन्हा ठरते आणि मौन राखणे देशभक्ती ठरते.
आज संविधान समजून घेतले नाही, तर उद्या ते वाचवण्याची संधीही उरणार नाही. म्हणूनच गणतंत्र दिवसाचा खरा अर्थ स्पष्ट आहे— देशप्रेम म्हणजे फक्त झेंडा फडकवणे नव्हे,तर देशप्रेम म्हणजे संविधान जपणे, पाळणे आणि जगणे आहे.
हा दिवस फक्त साजरा करण्याचा नाही, तो समजून घेण्याचा आहे. फक्त अभिमान व्यक्त करण्याचा नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर भारताची लोकशाही उभी आहे— आणि त्यांच्या विचारांशिवाय ती टिकू शकत नाही.

गणतंत्र दिनाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा...

              लेखक - डॉ. प्रा.देवानंद बि.नंदागवळी 

0 Response to "गणतंत्र दिवस : देशप्रेम की संविधानप्रेम?.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article