-->
विशेष प्रेरणादायी लेख…

विशेष प्रेरणादायी लेख…


    संकलन                          संग्रहक 
संजीव भांबोरे             हर्षवर्धन देशभ्रतार 

विचारांची क्रांतिज्योती सावित्रीआई फुले : हरवतो आहे का ?
.                       प्रा.राहुल डोंगर
 
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णगिणी क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी झिजविले—हे वाक्य उच्चारताना डोळ्यांसमोर येतो तो समाजाकडून होणारा अपमान, दगडधोंडे, अवहेलना… आणि तरीही हातात धरलेली ज्ञानाची पाटी. त्या थांबल्या नाहीत, रडल्या नाहीत, मागे फिरल्या नाहीत. कारण सावित्रीआई भावुक नव्हत्या; त्या विचारशील, विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्या होत्या.
आज मात्र सावित्रीआईंच्या नावाने फक्त माळा घातल्या जात आहेत, फोटो पूजले जात आहेत, त्यांच्या विचारांची राख रांगोळी केली जात आहे. जिने अंधश्रद्धेवर प्रहार केला, जिने प्रश्न विचारण्याचे धैर्य दिले, तिच्या नावाखालीच आपण पुन्हा अंधभक्तीच्या वाटेवर चाललो आहोत—हे किती भयावह वास्तव आहे!
सावित्रीआईंनी कधीही शिक्षणाला धर्माशी बांधले नाही. त्यांनी ज्ञानाला प्रश्न विचारायला शिकवले, उत्तर शोधायला शिकवले. पण आज आमच्याच भगिनी, सावित्रीआईंच्या नावाखाली, विवेकवाद विसरून अवाजवी धार्मिकता आणि कर्मकांडाकडे झुकत चालल्या आहेत. हे सावित्रीआईंच्या संघर्षावर अन्याय नाही काय?
आपण विचारले पाहिजे—
आजची पिढी खरोखरच सावित्रीआईंचा वारसा पुढे नेत आहे का?
की फक्त त्यांच्या जयंतीला शुभेच्छांचे पोस्ट टाकून आपण मोकळे होत आहोत?
सावित्रीआईंचा वारसा म्हणजे पूजा नव्हे—प्रश्न आहे.
सावित्रीआईंची शिकवण म्हणजे मौन नव्हे—बंड आहे.
सावित्रीआईंचा विचार म्हणजे अंधश्रद्धा नव्हे—विज्ञानवाद आहे.
आज सावित्रीच्या लेकीने देवाच्या चरणी नव्हे, तर विज्ञानाच्या प्रकाशात उभे राहिले पाहिजे. कारण विज्ञान माणसाला गुलाम बनवत नाही, तर मुक्त करते. बुद्धीप्रामाण्यवाद शिकवतो की, जे तपासता येत नाही, त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही.
जर येणारी पिढी विवेकवादी, प्रश्न विचारणारी, निर्भय झाली नाही—तर सावित्रीआईंचे स्वप्न अपूर्ण राहील.
जर स्त्री शिक्षित असूनही विचारांनी गुलाम राहिली—तर शिक्षणाचा अर्थच संपतो.
आजच्या जन्मदिनी आपण फक्त अभिवादन न करता, एक ठाम भूमिका घ्यायला हवी—
सावित्रीआईंच्या नावाने अंधश्रद्धा नव्हे, विज्ञानवाद पसरवूया.
भावनेपेक्षा विचार मोठा ठेऊया.
पूजेपेक्षा परिवर्तन महत्त्वाचे मानूया.
हीच सावित्रीआईंना खरी आदरांजली ठरेल.
कारण क्रांतिज्योतीला फुलांनी नव्हे—विचारांच्या ज्वालांनी मानवंदना दिली पाहिजे.सावित्रीच्या लेकीनो,विचाराला कृतीची साथ द्या आणि क्रांतिज्योती सावित्रीआई फुलेना जे अपेक्षित होतं, ते तुमच्या हातून घडू द्या,हीच माफक अपेक्षा!

……राहूल डोंगरे…..
शिवाजी नगर,तुमसर.जि.भंडारा.
मो.न.९४२३४१३८२६

0 Response to "विशेष प्रेरणादायी लेख…"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article