अर्जुनी/मोर येथील रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीबाबत पोलिसांना निवेदन.
शुक्रवार, 23 जनवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जुनी/मोरगाव :- मध्यवर्ती भागातील रेल्वे फाटक परिसरात वारंवार होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते अश्विनसिंह गौतम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलिस स्टेशन अर्जुनी/मोर यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, रेल्वे फाटक बंद असताना अवजड वाहने, चारचाकी-दुचाकी वाहने तसेच पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने संपूर्ण परिसरात गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळण्यात अडचणी निर्माण होतात व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येवर तातडीचा उपाय म्हणून रेल्वे फाटक बंद असताना
नियमितपणे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यासोबतच नागरिकांना वाहतूक नियमांचेपालन करण्याबाबत समज व मार्गदर्शन देण्याचीही विनंती करण्यात आली. यावेळी यूथ इन अॅक्शन संघटनाचे सदस्य सुधांशु अनिल मेहता, नयन दीपक रुखमोडे, सुमितसिंह गोपालसिंह परिहार, वैभव उमेश राजाभोज उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि लवकरच रेल्वे फाटक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
0 Response to "अर्जुनी/मोर येथील रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीबाबत पोलिसांना निवेदन."
एक टिप्पणी भेजें