परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच का आवश्यक आहे?..डां.देवानंद बी.नंदागवळी
शुक्रवार, 23 जनवरी 2026
1 Comment
. डां.देवानंद बी.नंदागवळी
संकलन/संग्रहक
हर्षवर्धन देशभ्रतार
आज समाजात परिवर्तनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत, संविधानाची मूल्ये रुजलीच पाहिजेत, समाज अधिक न्याय्य आणि समताधिष्ठित व्हायलाच हवा—असे म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड किती जण देतात, हा खरा प्रश्न आहे. परिवर्तन घडवण्यासाठी मोठी सत्ता किंवा पद आवश्यकच असते, हा गैरसमज आहे. इतिहास सांगतो की मोठे सामाजिक बदल सामान्य माणसाच्या असामान्य विचारांतून आणि प्रामाणिक कृतीतून घडले आहेत. आज आपण थोडेसे सत्य बोललो, थोडा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, निसर्गाविषयी जबाबदारीने वागलो आणि माणुसकी जपली, तरी परिवर्तनाची सुरुवात होते.
आजची सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे.
आपल्याला अन्न हवे आहे, पण अन्न देणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्याची मानसिकता कमी होत चालली आहे.
पाणी हवे आहे, पण पाणी वाचवण्याची सवय नाही. सावली हवी आहे, पण झाडे लावणे व जगवणे ही आपली जबाबदारी मानली जात नाही.
मुलगी देवी, माता, बहीण आहे असे म्हणताना आपण थकत नाही, पण समाजात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत—हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.
सर्व शासकीय कामे वेळेवर व्हावीत अशी अपेक्षा असते, पण वाढता भ्रष्टाचार गरीब व दुर्बलांचे हक्क हिरावून घेत आहे.
मोफत व दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळांमधून मिळावे, असे सर्वांनाच वाटते; मात्र त्या शाळा वाचवण्यासाठी पुढे येणारे हात फार कमी दिसतात.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न सुरू असले, तरी समाजातीलच काही घटक अंधश्रद्धेला खतपाणी घालताना दिसतात.
महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचलेच पाहिजेत, असे म्हणणारे आपण सर्वजण आहोत. पण जेव्हा कोणी विद्यार्थी, तरुण किंवा सामाजिक कार्यकर्ता हे विचार कृतीत उतरवतो, तेव्हा त्याला पाठिंबा देण्याऐवजी त्याच्याच जवळच्या लोकांकडून विरोध, टीका आणि पाय ओढण्याची प्रवृत्ती दिसून येते. दुर्दैवाने, कुणाचं चांगलं झालेलं पाहवत नाही, ही मानसिकता आजही समाजात खोलवर रुजलेली आहे.
तथापि, इतिहास साक्ष देतो की प्रत्येक महापुरुषाला सुरुवातीला विरोध सहन करावा लागलेला आहे. समाजाला अस्वस्थ करणारे विचारच पुढे समाजाला दिशा देतात. त्यामुळे टीका ही अडथळा न मानता ती आत्मपरीक्षणाची संधी मानली पाहिजे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संविधानाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जगण्याची दिशा आहे. संविधानाचा सन्मान म्हणजे या मूल्यांचा प्रत्यक्ष जीवनात स्वीकार.
परिवर्तन केवळ चर्चांनी, भाषणांनी किंवा घोषणा देऊन होत नाही. ते रोजच्या छोट्या कृतींतून घडते. आज आपणच पाणी वाचवले, झाड लावले, मुलगी म्हणजे अभिमान आहे हे ठामपणे मांडले, अन्यायाविरुद्ध शांत पण ठाम भूमिका घेतली—तर उद्याचा समाज बदलू लागेल.
समाज बदलायचा असेल, तर आधी आपण बदलायला हवे.
कारण इतिहास शेवटी एकच प्रश्न विचारतो— “तू काय केलंस?”
डॉ. देवानंद बि. नंदागवळी
९४२०६१९३०७
Well noticed, wisely said 🙏👍
जवाब देंहटाएं