-->
​बारव्हा परिसरात जिओची सेवा 'ठप्प'.

​बारव्हा परिसरात जिओची सेवा 'ठप्प'.


 
• रेंजअभावी नागरिक त्रस्त, ग्राहकांचा 'पोर्ट' करण्याकडे कल
राजन मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखांदूर :- मागील तीन दिवसांपासून बारव्हा आणि परिसरात जिओ कंपनीची मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सतत खंडित होणाऱ्या नेटवर्कमुळे नागरिक आणि व्यावसायिकांचे मोठे हाल होत असून, "हातातला महागडा मोबाईल आता केवळ खेळणे बनला आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक मोबाईल धारकांमधून उमटत आहे.
​गेल्या ७२ तासांपासून या भागात जिओची रेंज वारंवार गायब होत आहे. रेंज असली तरी कॉल दरम्यान आवाज व्यवस्थित येत नाही किंवा कॉल आपोआप कट होतो. यामुळे एकमेकांशी साधा संवाद साधणेही कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा असल्यास नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
​केवळ कॉलिंगच नाही, तर इंटरनेटची सुविधाही अत्यंत धीम्या गतीने चालत आहे. आजच्या काळात बँकिंग व्यवहार, ऑनलाईन शिक्षण, सरकारी कामे आणि व्यापार पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहेत. मात्र, जिओचे नेट चालत नसल्यामुळे डिजिटल पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत, ज्याचा थेट फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे.
​नेटवर्कच्या या लपंडावामुळे संतप्त झालेले ग्राहक आता पर्यायी मार्ग शोधत आहेत. अनेक तरुणांनी आणि व्यावसायिकांनी जिओचे सिम कार्ड सोडून इतर कंपन्यांचे सिम घेण्यास सुरुवात केली आहे. "पैसे भरूनही सेवा मिळत नसेल, तर कंपनी बदललेली बरी," असा पवित्रा अनेक मोबाईल धारकांनी घेतला आहे.
​ "आम्ही वारंवार तक्रारी करूनही नेटवर्कमध्ये सुधारणा होत नाही. कंपनीने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन बारव्हा परिसरातील जिओ टॉवरची क्षमता वाढवावी किंवा तांत्रिक बिघाड दुरुस्त करावा, अन्यथा सर्व ग्राहक सामूहिकरीत्या सिम कार्ड बंद करतील."असा सज्जड इशारा जिओ सिम धारकांनी दिला आहे.

0 Response to "​बारव्हा परिसरात जिओची सेवा 'ठप्प'."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article