-->
तावशी येथील 'बोळी'वर अतिक्रमणाचा विळखा.

तावशी येथील 'बोळी'वर अतिक्रमणाचा विळखा.

• रेकॉर्डला बोळी मात्र प्रत्यक्षात सिमेंटचे घरे.
 राजन मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, शासकीय रेकॉर्डवर 'बोळी' (तलाव) म्हणून नोंद असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमणात केवळ नागरिकच नव्हे, तर चक्क शासकीय इमारतीचेही बांधकाम करण्यात आल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
​तावशी गावाला लागूनच गट नं. १ मध्ये सुमारे १.१२ हेक्टर आर क्षेत्रात ही शासकीय बोळी पसरलेली आहे. महसूल विभागाच्या दप्तरी आजही या जागेची नोंद 'बोळी तलाव' अशीच आहे. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. या विस्तीर्ण जागेवर आता पाण्याचा साठा करण्याऐवजी पक्की बांधकामे उभी राहिली आहेत.
​ अनेक स्थानिक नागरिकांनी बोळीच्या पात्रात व काठावर पक्की घरे आणि इतर बांधकामे केली आहेत.​ गावाचा धुरा सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतीनेही स्वतःची नवीन इमारत याच बोळीच्या जागेत उभी केली आहे.​ ​या बोळीच्या खालील भागात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यांना पूर्वी या तलावातून पाणी मिळत असे. मात्र, आता तलावाचे अस्तित्वच संपत आल्याने हे शेतकरी पाण्यापासून पूर्णतः वंचित झाले आहेत. पावसाचे पाणी साठवण्याची नैसर्गिक जागा नष्ट झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
​प्रशासकीय दुर्लक्ष की मेहेरबानी?
​शासकीय रेकॉर्डला तलाव असताना तिथे बांधकामांना परवानगी कशी मिळाली? किंवा विनापरवाना बांधकामे होत असताना स्थानिक प्रशासनाने डोळेझाक का केली? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नैसर्गिक जलस्त्रोत बुजवून त्यावर सिमेंटचे बांधकाम करणे हे उघडपणे नियमांचे उल्लंघन आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून, बोळीचे क्षेत्र रिकामे करावे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

0 Response to "तावशी येथील 'बोळी'वर अतिक्रमणाचा विळखा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article