लाडकी बहीणसाठी एससीच्या ९८ कोटींवर डल्ला.
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
पँथर आर्मीतर्फे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध.
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई :- दि. २०- राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अनुसूचित जाती (एससी) उपयोजनेतील. ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वळवल्याने पँथर आर्मी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. दलितांच्या कल्याणासाठी असलेला निधी इतर योजनांकडे वळवून सरकार मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप करत पँथर आर्मीने या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी विशेष उपयोजनेतून हा निधी वितरित करण्यास बुधवारी मंजुरी दिली. अनुसूचित जातीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी असलेला विशेष निधी इतर सर्वसाधारण योजनांकडे वळवणे हा अन्यायकारक आहे.
या निधीअभावी दलित वस्ती सुधारणा, शिष्यवृत्ती आणि इतर कल्याणकारी योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी दलितांच्या हक्काच्या पैशांचा वापर केला जात असल्याची टीका संघटनेने केली आहे. पँथर आर्मीच्या प्रक्त्यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना राबवण्यास आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी दलितांच्या हक्काचा पैसा वापरणे चुकीचे आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेऊन उपयोजनेचा निधी केवळ अनुसूचित जातीच्या विकासासाठीच खर्च करावा. अन्यथा, संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. या निर्णयामुळे सामाजिक न्याय विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.
0 Response to "लाडकी बहीणसाठी एससीच्या ९८ कोटींवर डल्ला."
एक टिप्पणी भेजें