नागपुरात 'आरएसएस '(संघ) मुख्यालयावर धडकणार महामोर्चा
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत मुक्ती मोर्चा करणार नेतृत्व.
मूलभूत अधिकारांचे हनन आणि लोकशाहीविरोधी कारवायांच्या निषेधार्थ.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. २२ फेब्रुवारी २०२६ रविवार रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयावर विशाल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन आणि लोकशाहीविरोधी कारवायांच्या निषेधार्थ हा एल्गार पुकारण्यात आला असल्याचे आयोजकांनी दि.१९ फेब्रुवारी रोजी विश्रामगृह भंडारा येथे बोलाविलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. डिसेंबर २०२५ मध्ये ओडिसा राज्यातील कटक येथे बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे ४५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. प्रशासनाकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आणि संघटनेने
कोट्यवधी रुपये खर्चकरूनतयारी पूर्ण केल्यानंतर, ऐनवेळी स्थानिक प्रशासन वसत्ताधारी दबावाखाली या परवानग्या रद्द करण्यात आल्या. यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचे नुकसान झाले आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, असा आरोप आयोजकांनी केला आहे. या दडपशाहीच्या विरोधात वामन मेश्राम यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, नागपूरचा महामोर्चा हा त्याचा चौथा आणि मुख्य टप्पा आहे. ओडिसा येथील रद्द करण्यात आलेल्या अधिवेशनास पुन्हा परवानगी देण्यात यावी. ओबीसींसह सर्व जातींची तातडीने जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी 'बॅलेट पेपर'वर घेण्यात याव्यात. प्रशासकीय
गोंधळामुळे संघटनेचे व कार्यकर्त्यांचे जे आर्थिक नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी. मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेले ओडिसा सरकार अनुच्छेद ३५६ अन्वये बरखास्त करावे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. या विशाल महामोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल करणार आहेत. हा मोर्चा नागपूर येथील इंदौरा चौक येथून सुरू होईल आणि महाल येथील आरएसएस मुख्यालयावर धडकेल. या आंदोलनाला भारतातील मूळनिवासी बहुजन समाजातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटना, शेतकरी संघटना आणि भाजप वगळता अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या महामोर्चात देशभरातून लाखो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रपरिषदेत दिली.
0 Response to "नागपुरात 'आरएसएस '(संघ) मुख्यालयावर धडकणार महामोर्चा"
एक टिप्पणी भेजें